अहेरी:2जुलै
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 क वरील रस्ते आणि पुलाच्या कामाचा दर्जा आता थेट निसर्गानेच समोर आणला आहे. सुभाषनगर-मुत्तापुर-बोरी नजीक असलेल्या मुक्तापूर नाल्यावर नवीन पुलाचे काम संथगतीने सुरू असून, रहदारीसाठी कंत्राटदाराने तात्पुरता तयार केलेला रपटा काल रात्री झालेल्या पहिल्याच मोठ्या पावसात वाहून गेला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, या रस्त्याचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू असल्याची ग्रामस्थांची आधीपासूनच तक्रार होती. मुक्तापूर नाल्यावर जुन्या पुलाऐवजी नवीन पूल बांधण्याचे काम हाती घेतले आहे, मात्र अद्यापपर्यंत केवळ पायाभरणीचे काम सुरू असल्याचे दिसते. रहदारी सुरू ठेवण्यासाठी कंत्राटदाराने माती आणि खडीचा वापर करून एक कच्चा रपटा (डायव्हर्शन) बनवला होता. परंतु, काल रात्री परिसरात जोरदार पाऊस पडल्याने नाल्याच्या पाण्याचा प्रवाह वाढला आणि हा रपटा पूर्णपणे वाहून गेला.या रपट्याच्या वाहून जाण्यामुळे या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. याचा सर्वात मोठा फटका दक्षिण गडचिरोली भागाला बसला असून, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यांचा संपर्क तुटला आहे. अनेक प्रवासी, विशेषतः रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक प्रवासी रस्त्याच्या दोन्ही बाजूला अडकून पडले आहेत.
कंत्राटदाराच्या हलगर्जीपणावर संताप:
या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये कंत्राटदाराविरुद्ध तीव्र संताप निर्माण झाला आहे. “पहिल्याच पावसात जर रपटा टिकू शकला नाही, तर या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. पावसाळ्यापूर्वीच या कामाला गती देणे आवश्यक होते,” असे मत एका संतप्त प्रवाशाने व्यक्त केले. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरत आहे.या घटनेचा आणि रस्त्याच्या परिस्थितीचा सविस्तर अहवाल संबंधित विभागाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, सध्या तरी दक्षिण गडचिरोलीच्या नागरिकांना वाहतुकीसाठी कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतो आहे.




