विकासाच्या गप्पा नको, आधी सुरक्षित रस्ते द्या” : राष्ट्रीय महामार्ग 353 क च्या दुरावस्थेवरून  सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार संतप्त

0
1

 

गडचिरोली : स्टील हब,उद्योग आणि विकासाची स्वप्ने दाखवली जात आहेत पण दुसरीकडे जिल्ह्यातील नागरिकांना साधा सुरक्षित रस्ताही उपलब्ध नाही,अशा तीव्र शब्दांत सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी हिवाळी अधिवेशनात सुरू असलेल्या विकासाच्या गप्पांवर हल्लाबोल केला आहे.NH-353C आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे काम 6 वर्षांपासून अपूर्ण असल्याने जनतेचा संयम संपत चालला असून तीव्र लोकशाही आंदोलनाचा इशारा त्यांनी प्रेस नोटद्वारे दिला आहे.

प्रेस नोटमध्ये ताटीकोंडावार म्हणाले,आज हिवाळी अधिवेशनात गडचिरोलीच्या विकासावर मोठमोठी भाषणे केली जात आहेत.मात्र एकेकाळी मुंबईत बसलेल्या सत्ताधाऱ्यांना गडचिरोली कुठे आहे,हेही माहीत नव्हते.आज जिल्ह्याची चर्चा होत असली तरी ती जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर नाही,तर केवळ घोषणांपुरतीच मर्यादित आहे. जनतेला स्टील हब नको, आधी जीव वाचवणारे रस्ते द्या.”

आलापल्ली–सिरोंचा या सुमारे 100 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम तब्बल सहा वर्षांपासून रेंगाळले आहे.या मार्गावरील शेकडो गावांतील हजारो नागरिक रोज जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था अधिकच बिकट होते. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे, वाहून गेलेले पूल, चिखल यामुळे अपघातांचा धोका प्रचंड वाढला आहे.एखादा निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडल्यावरच शासन आणि लोकप्रतिनिधी जागे होणार का?” असा संतप्त सवाल ताटीकोंडावार यांनी केला.

गडचिरोलीचे पालकमंत्री स्वतः मुख्यमंत्री असतानाही जिल्ह्याची ही अवस्था अत्यंत दुर्दैवी आहे.ही परिस्थिती केवळ प्रशासनाचे अपयश नाही,तर लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेचेही प्रतीक आहे.जनतेने वारंवार प्रश्न मांडले,निवेदने दिली, आंदोलने केली,तरीही त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे,अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

ताटीकोंडावार गेल्या अनेक वर्षांपासून लोकशाही मार्गाने आंदोलने, उपोषणे, निवेदने आणि जनआंदोलनांच्या माध्यमातून जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.तरीही जर या निर्लज्ज शासन-प्रशासनाला जाग येत नसेल, तर हा लोकशाहीचा पराभव असून जनतेच्या संयमाची परीक्षा घेण्याचे काम सुरू आहे,असे ताटीकोंडावार म्हणाले.

संतोष ताटीकोंडावार यांनी प्रेस नोटमधून शासनाला स्पष्ट शब्दांत 3 मागण्या केल्या आहेत :

1.NH-353च आलापल्ली–सिरोंचा महामार्गाचे काम तातडीने व युद्धपातळीवर पूर्ण करावे.2.पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित व प्रभावी उपाययोजना कराव्यात.3.कामातील विलंब आणि निष्काळजीपणासाठी जबाबदार अधिकारी व संबंधित कंत्राटदारांवर कठोर फौजदारी कारवाई करावी.

गडचिरोलीच्या जनतेचा संयम आता संपत चालला आहे.विकासाच्या घोषणा पुरेशा नाहीत;प्रत्यक्ष काम करून दाखवा. अन्यथा जनतेचा उद्रेक आणि तीव्र लोकशाही आंदोलन अटळ असेल, याची संपूर्ण जबाबदारी शासन आणि संबंधित लोकप्रतिनिधींवर राहील,असा थेट इशारा त्यांनी शेवटी दिला आहे.