अहेरी:
येथील १०० खाटांच्या महिला व बाल रुग्णालयातील आरोग्य सेवा सध्या व्हेंटिलेटरवर आली आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी सामूहिक राजीनामे दिल्याने येथील आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडली असून, यामुळे सर्वसामान्य जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे. जिल्हा शल्यचिकित्सिका डॉ. लहाडे यांच्या हेकेखोर आणि वादग्रस्त वृत्तीमुळेच कंटाळून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हे राजीनामे दिल्याचा गंभीर आरोप आता समोर आला आहे.
वादग्रस्त कारकीर्द असतानाही नियुक्ती कशी?
डॉ. लहाडे यांची कारकीर्द सुरुवातीपासूनच अत्यंत वादग्रस्त राहिलेली आहे. असे असतानाही त्यांच्याकडे ‘जिल्हा शल्यचिकित्सक’ या अत्यंत जबाबदारीच्या आणि महत्त्वाच्या पदाचा कार्यभार सोपवण्यात कसा आला? असा संतप्त सवाल नागरिकांकडून आणि राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे. त्यांच्या मनमानी कारभारामुळेच अहेरीतील रुग्णालयाची आज ही दुरवस्था झाली आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांची थेट ‘मुंबई’ गाठत आरोग्यमंत्र्यांकडे धाव!
अहेरीतील आरोग्य व्यवस्थेचे हे गंभीर संकट पाहता, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मद्दीवार, नगरसेवक अमोल गुडेल्लीवार, विकास उईके, मुकेश नामेवार आणि संजय पोहणेकर यांनी थेट मुंबई विधानभवन येथे राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेतली.या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने अहेरी रुग्णालयाची विदारक परिस्थिती आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच डॉक्टरांची प्रतिनियुक्ती केल्यानंतरही प्रत्यक्ष कामात नेमक्या काय अडचणी येत आहेत, याची सविस्तर माहिती दिली.
प्रमुख मागण्या:
वादग्रस्त जिल्हा शल्यचिकित्सिका डॉ. लहाडे यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांची तातडीने जिल्ह्याबाहेर बदली करण्यात यावी.
अहेरी महिला व बाल रुग्णालयात तातडीने पूर्णवेळ आणि तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करून पदभरती प्रक्रियेला गती द्यावी.
आरोग्यमंत्र्यांचे तातडीने चौकशीचे निर्देश; अहेरीकरांना लवकरच दिलासा!
अहेरीतील या संवेदनशील परिस्थितीचे आणि विषयाचे गांभीर्य ओळखून आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी तत्काळ डॉ. लहाडे यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.याशिवाय, अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयातील रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी लवकरात लवकर उत्तम आणि तज्ज्ञ डॉक्टर अहेरीला पाठवले जातील, असा सकारात्मक शब्दही त्यांनी दिला. आरोग्यमंत्र्यांच्या या आश्वासनामुळे आता अहेरी रुग्णालयातील अडचणी दूर होऊन रुग्णांना लवकरच दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.




