गडचिरोलीत लॉयड्सच्या कौशल्य विकास केंद्राला डॉ. पंकज भोयर यांची भेट; उपक्रमांचे केले कौतुक

0
2

गडचिरोली

राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार आणि खाणकाम राज्यमंत्री तसेच वर्धा व भंडारा जिल्ह्यांचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी रविवारी ‘लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड एंटरप्रेन्योरशिप’ (LMGSE) या कौशल्य विकास केंद्राला भेट देऊन पाहणी केली. स्थानिक तरुणांना रोजगाराभिमुख शिक्षण देऊन सक्षम करणाऱ्या या उपक्रमाचे त्यांनी मनापासून कौतुक केले.

लॉयड्स मेटल्स अँड ENERGY लिमिटेडद्वारे संचलित हे केंद्र गडचिरोलीतील तरुणांना उद्योग-आधारित आधुनिक कौशल्ये आणि रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देत आहे.

याावेळी डॉ. भोयर यांनी केंद्रातील पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षण पद्धतींची पाहणी करत संस्थेच्या उच्च दर्जाच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांशी वैयक्तिक बोलताना त्यांच्यातील आत्मविश्वास, ज्ञान आणि कौशल्यांचे स्पष्टीकरण पाहून मंत्री महोदय विशेष प्रभावित झाले.

एकेकाळी दुर्गम व मागास मानल्या गेलेल्या गडचिरोली जिल्ह्याचे भविष्य बदलण्यात असे कौशल्य विकास उपक्रम मोलाची भूमिका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री बी. प्रभाकरन यांच्या दूरदृष्टीचे आणि संकल्पनेचे त्यांनी विशेष आभार मानले.

डॉ. भोयर हे गडचिरोली येथे जिल्ह्याच्या बदलत्या स्वरूपावर आधारित दोन दिवसीय ‘मिशन २०४७’ च्या उद्घाटनासाठी आले असता त्यांनी या केंद्राला भेट दिली.