आ.धर्मरावबाबांच्या अल्टिमेटमचा दणका! अहेरी महिला व बाल रुग्णालयातील रिक्त पदांच्या भरतीला वेग.

0
1

​अहेरी :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयातील रिक्त पदांच्या प्रश्नावर आ.डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी आक्रमक भूमिका घेत दिलेल्या अल्टिमेटमचा अखेर सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. अवघ्या दोन दिवसांत आवश्यक कार्यवाही करण्याचा इशारा मिळताच आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलली आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी गावंडे यांनी काही तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या असून, इतर ठिकाणच्या प्रतिनियुक्तीवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही तातडीने परत बोलावले आहे. या सर्व घडामोडींची सविस्तर माहिती आमदार आत्राम यांना देण्यात आल्यानंतर, त्यांनी १३ ऑक्टोबर रोजी रुग्णालयाला कुलूप ठोकण्याचा आपला निर्णय तूर्त मागे घेतला आहे.
​४२ मंजूर पदांपैकी २७ भरलेली, १५ रिक्त!
दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील गरोदर माता व बालकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने कोट्यवधी रुपये खर्चून अहेरी येथे महिला व बाल रुग्णालय उभारण्यात आले. मात्र, रुग्णालयातील रिक्त पदांमुळे येथील आरोग्य सेवेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. उपलब्ध माहितीनुसार, या रुग्णालयासाठी ४२ नियमित पदे मंजूर असून, त्यापैकी २७ पदे भरलेली तर १५ पदे रिक्त आहेत. यात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह परिचारिका, बालरोग परिचारिका, रक्तपेढी तंत्रज्ञ, औषधनिर्माता व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
​मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ८ नोव्हेंबर २०२५ रोजी या रुग्णालयाचे लोकार्पण झाले होते. त्यानंतर १३ फेब्रुवारी २०२६ रोजी आरोग्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती. महिनाभरात रिक्त पदे भरण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र मनुष्यबळाचा प्रश्न कायम राहिल्याने आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता.
​इशाऱ्यानंतर जागी झाली यंत्रणा
रुग्णालयातील रिक्त पदे त्वरित भरावीत आणि प्रतिनियुक्तीवर गेलेले अधिकारी-कर्मचारी तात्काळ परत बोलवावेत, अशी आक्रमक मागणी आ.डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी केली होती. मागण्या पूर्ण न झाल्यास १३ ऑक्टोबर रोजी रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन कुलूप ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला होता.
​या सقت इशाऱ्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी गावंडे यांनी तातडीने सूत्रे हलवत काही तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आणि प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांना रुजू करून घेतले. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी स्वतः आमदार आत्राम यांची भेट घेऊन केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. आरोग्य विभागाच्या या तत्परतेमुळे आमदारांनी कुलूप ठोकण्याचे आंदोलन सध्या स्थगित केले आहे.
​दरम्यान, उर्वरित तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे त्वरित न भरल्यास आणि येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुन्हा विनाकारण प्रतिनियुक्तीवर पाठवल्यास आरोग्य विभागाची खैर नाही, असा सज्जड दमही आमदार आत्राम यांनी यावेळी भरला आहे.

​”जिल्ह्याच्या दक्षिण भागातील नागरिकांसाठी अहेरी येथील महिला व बाल रुग्णालय अत्यंत महत्त्वाचे आहे. दुर्गम भागातील गरोदर माता, नवजात बालके व लहान मुलांना वेळेवर उपचार मिळण्यासाठी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचाऱ्यांची उपलब्धता वाढविण्यावर आमचा भर आहे. तज्ज्ञ व इतर डॉक्टरांच्या १६ मंजूर पदांपैकी १३ पदे भरली असून, उर्वरित ३ पदे भरण्याची प्रक्रिया वेगात सुरू आहे. रुग्णांची कोणतीही गैरसोय होऊ दिली जाणार नाही.”
– डॉ. रवी गावंडे, जिल्हा शल्यचिकित्सक, गडचिरोली