पोलीस महासंचालक म. रा. मुंबई श्री. सदानंद दाते यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पिपिंग समारंभ संपन्न
गडचिरोली पोलीस दलातील आतापर्यंत एकूण ४०४ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना वेगवर्धित पदोन्नती प्राप्त
गडचिरोली:
गडचिरोली जिल्ह्यात कर्तव्य बजावताना उत्कृष्ट कामगिरी, धाडसी कारवाया, शौर्य व उल्लेखनीय सेवेमुळे गडचिरोली पोलीस दलातील पाच सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या कार्याची दखल घेत गृह विभागामार्फत मा. पोलीस महासंचालक म. रा. मुंबई यांच्याकडून त्यांना पोलीस निरीक्षक पदी वेगवर्धित पदोन्नती देण्यात आलेली आहे. त्यानिमित्ताने आज दिनांक ०३ जुलै २०२६ रोजी मा. पोलीस महासंचालक म. रा. श्री. सदानंद दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथे पिपिंग समारंभ पार पडला.गडचिरोलीसारख्या अतिसंवेदनशील आणि माओवादप्रभावित जिल्ह्यात अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत धैर्य, शिस्त, प्रामाणिकपणा आणि समर्पित भावनेने सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ही वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा अधिक उंचावली असून इतर अधिकाऱ्यांनाही उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रेरणा मिळणार आहे.

या समारंभात मा. पोलीस महासंचालक म. रा. श्री. सदानंद दाते यांच्या हस्ते गडचिरोली जिल्ह्यातील वेगवर्धित पदोन्नतीप्राप्त पोलीस अधिकारी १) सपोनि. योगिराज जाधव, २) सपोनि. सचिन झनक, ३) सपोनि. बाबासाहेब दुधाळ, ४) सपोनि. सुनिल बागल व ५) सपोनि. राहुल देव्हडे यांच्या खांद्यावर पोलीस निरीक्षक पदाची चिन्हे (Pips) लावून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पदोन्नतीप्राप्त अधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गडचिरोली पोलीस दलासाठी ही अभिमानाची बाब असून, या पदोन्नतीमुळे दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल निश्चितच उंचावणार आहे. पोलीस दलातील उत्कृष्ट कार्याचा सन्मान होत असल्याने सेवेत गुणवत्ता, शौर्य आणि कर्तव्यनिष्ठेला अधिक बळ मिळत असल्याची भावना यावेळी मा. पोलीस महासंचालक म. रा. श्री. सदानंद दाते यांनी व्यक्त केली. यासोबत माओवाद विरोधी अभियानादरम्यान आलेले अनुभव, विविध आव्हाने तसेच कार्यपद्धती जाणून घेत अत्यंत दुर्गम, प्रतिकूल व संवेदनशील परिस्थितीत बजावलेल्या कर्तव्याचे विशेष कौतुक केले. गडचिरोली पोलीस दलास आजपर्यंत ०३ शौर्य चक्र, ०६ राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक, ३३८ पोलीस शौर्य पदक, २० गुणवत्ता सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक, १५१० मा. पोलीस महासंचालक पदक व ४०४ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना वेगवर्धित पदोन्नती मिळालेली आहे.सदर पिपिंग समारंभात मा. पोलीस महासंचालक म. रा. श्री. सदानंद दाते, मा. अपर पोलीस महासंचालक (एटीएस) म. रा. श्री. नवल बजाज, मा. अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) म. रा. डॉ. श्री. निखिल गुप्ता, मा. आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग म. रा. श्री. शिरीष जैन, मा. अपर पोलीस महासंचालक (सायबर) म. रा. श्री. यशस्वी यादव, मा. अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) म. रा. डॉ. श्री. छेरिंग दोरजे, सहाय्यक पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) श्री. सागर पाटील, पोलीस अधीक्षक (डायल ११२) श्री. प्रशांत मोहिते, पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. एम. रमेश हे उपस्थित होते. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली, श्री. एम. रमेश यांनी देखील वेगवर्धित पदोन्नती प्राप्त पोलीस अधिकारी यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.




