कौशल्यामुळे गडचिरोलीतील मुलींच्या डोळ्यांत दिसतोय नवा आत्मविश्वास!” – अमृता फडणवीस

0
5

गडचिरोली:

गडचिरोलीतील युवक-युवतींसाठी ‘लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड आंत्रप्रेन्युअरशिप’ने (एलएमजीएसई) उभारलेल्या सुविधा आणि राबविलेले उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहेत. विशेषतः या दुर्गम भागातील मुलींना कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षम बनविण्यासाठी संस्थेने घेतलेला पुढाकार हाच खऱ्या अर्थाने विकास आहे. आज प्रशिक्षण पूर्ण केलेल्या या मुलींच्या डोळ्यांतील आत्मविश्वास आणि औद्योगिक क्षेत्रात यशस्वी वाटचाल करण्याची त्यांची तयारी स्पष्टपणे दिसत आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध बँकर आणि समाजसेविका अमृता फडणवीस यांनी केले.’एलएमजीएसई’तर्फे आयोजित भव्य पदवीदान सोहळ्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. या सोहळ्यात विविध तांत्रिक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ४०० विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली, तसेच या सर्व विद्यार्थ्यांना लॉयड्स समूहामध्ये थेट रोजगाराची संधीही उपलब्ध करून देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन होते.

अध्यक्षीय भाषणात बी. प्रभाकरन यांनी गडचिरोलीतील लॉयड्स-कर्टिन कार्यक्रमाची यशोगाथा मांडली. या पहिल्या बॅचमधील स्थानिक आदिवासी विद्यार्थी इग्नासियस बडा याने ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठातून ‘इनोव्हेशन अँड आंत्रप्रेन्युअरशिप’ विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केल्याचा विशेष उल्लेख त्यांनी केला. या विद्यार्थ्याच्या संपूर्ण शिक्षणाचा आणि राहण्याचा खर्च लॉयड्सने उचलला होता. या भागातील युवकाने परदेशातून अशी पदवी घेण्याची ही पहिलीच वेळ असून हा अत्यंत अभिमानास्पद क्षण असल्याचे प्रभाकरन म्हणाले.

प्रभाकरन यांनी पुढे सांगितले की, बांधकाम क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी एलएमजीएसईच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उच्च दर्जाचे प्रशिक्षण देऊन कुशल मनुष्यबळ तयार केले जात आहे.

“लॉयड्समध्ये रोजगार मिळवणारे हे विद्यार्थी केवळ कर्मचारी राहणार नसून, ईएसओपी (ESOP) योजनेअंतर्गत कंपनीचे समभाग देऊन त्यांना कंपनीचे भागीदार बनविण्यात येईल,” अशी घोषणा त्यांनी केली.

तसेच, महिलांना वाहतूक क्षेत्रात आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी भारतात प्रथमच महिला चालकांसाठी शौचालय सुविधेसह सुसज्ज ट्रेलर ट्रक सुरू करण्यात आल्याचे आणि भविष्यात गडचिरोलीत ‘फ्लाइंग स्कूल’ सुरू करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

विविध सामाजिक प्रकल्पांचे डिजिटल उद्घाटन

या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते लॉयड्सच्या अनेक लोककल्याणकारी प्रकल्पांचे डिजिटल पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. यामध्ये लॉयड्स एकलव्य वसतिगृह व लॉयड्स शक्ती वसतिगृह (विद्यार्थ्यांसाठी राहण्याची सोय),लॉयड्स भोजनालय,लॉयड्स ड्रायव्हिंग स्कूल व लॉयड्स सक्षम गॅरेज,एलएमजीएसईचे अधिकृत संकेतस्थळ (Website)

याशिवाय, हेडरी येथे सामाजिक बांधिलकीतून उभारण्यात आलेल्या बहुविशेषता रुग्णालयात दररोज शेकडो रुग्णांवर मोफत उपचार केले जात असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.या सोहळ्याला ज्येष्ठ लोकप्रतिनिधी अरविंद नामदेवराव पोरेड्डीवार, अलका मिश्रा (संचालिका, लॉयड्स फेरा फोर्ज ग्लोबल),कीर्ती रेड्डी (संचालिका, लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन) आणि एस. वेंकटेश्वरन (कार्यकारी संचालक, लॉयड्स मेटल्स) हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. या भव्य कार्यक्रमामुळे गडचिरोलीतील युवकांच्या पंखांना जागतिक दर्जाच्या कौशल्याचे नवे बळ मिळाले आहे.