माओवादमुक्त जिल्ह्याच्या विकासात पोलीस पाटलांची भूमिका मोलाची – पोलीस अधीक्षक एम. रमेश ​जिल्हास्तरीय समन्वय बैठकीला ४०० पोलीस पाटलांची उपस्थिती; आरोग्य तपासणीचाही लाभ

0
1

गडचिरोली (प्रतिनिधी): गडचिरोली पोलीस दलाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील माओवाद जवळजवळ संपुष्टात आला असून जिल्हा आता विकासाकडे झेपावत आहे. या बदलत्या परिस्थितीत गावातील शांतता आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी ‘पोलीस पाटील’ हा घटक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी केले.

​पोलीस मुख्यालय येथील शहीद पांडू आलाम सभागृहात आज ९ मे रोजी आयोजित जिल्हास्तरीय ‘पोलीस पाटील समन्वय बैठकीत’ ते बोलत होते. या कार्यशाळेला जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील विविध गावांतील सुमारे ४०० पोलीस पाटील उपस्थित होते.

गावातील प्रश्नांवर नियंत्रण हीच जबाबदारी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “पोलीस पाटील हे सामान्य जनता आणि पोलीस प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहेत. गावातील महिलांवरील अत्याचार, अंधश्रद्धा, गंभीर गुन्हे, काळी जादू आणि तंटे यांवर प्रतिबंध घालण्याची मोठी जबाबदारी पोलीस पाटलांवर आहे. गडचिरोली जिल्हा आता माओवादाची ओळख पुसून विकासाच्या मार्गावर चालत आहे, यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे.”

आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केवळ बैठकच नव्हे, तर पोलीस पाटलांच्या आरोग्याचा विचार करून समन्वय बैठकीदरम्यान आरोग्य तपासणी शिबिर देखील आयोजित करण्यात आले होते. पोलीस रुग्णालय, गडचिरोली येथील वैद्यकीय पथकाकडून उपस्थित सर्व पोलीस पाटलांची कसून आरोग्य तपासणी करण्यात आली.

विविध विषयांवर मार्गदर्शन या कार्यशाळेत गुन्हेगारी नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था, व्यसनमुक्ती, तंटामुक्ती आणि सामाजिक सलोख्याची जपणूक या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. योगराज नाकाडे व महिला जिल्हाध्यक्ष श्रीमती लता ऊईके यांनीही उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले.

अधिकारी व अंमलदारांची उपस्थिती या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री. स्वप्निल इज्जपवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सपोनि. भगतसिंग दुलत व सर्व पोलीस अंमलदारांनी विशेष परिश्रम घेतले.