कोनसरी येथे लॉईड्स कंपनीतर्फे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास सुकर; ८३ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप

0
1

कोनसरी, दि. २४ जुलै:

शिक्षणाला बळकटी देणे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड आणि लॉईड्स इन्फिनिट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये ‘शालेय सहाय्यता कार्यक्रमा’ अंतर्गत इयत्ता ९ वी ते १२ वीमधील एकूण ८३ गरजवंत विद्यार्थ्यांना मोफत शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप उत्साहात करण्यात आले.

​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हायस्कूलचे मुख्याध्यापक मा. कोहाडे सर उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे प्रशासन विभागप्रमुख मा. बेणूगोपाल सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बेणूगोपाल सर म्हणाले, “शिक्षणातील सातत्य आणि कठोर परिश्रम हेच उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करतात.” त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासात जिद्द ठेवून पुढे जाण्याचे आवाहन केले.

​याप्रसंगी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (CSR) विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​वेळेवर शैक्षणिक साहित्य उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. कंपनीने जपलेल्या या सामाजिक बांधिलकीबद्दल विद्यार्थी व पालकांनी लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड आणि लॉईड्स इन्फिनिट फाऊंडेशनचे मनःपूर्वक आभार मानत या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.