आलापल्ली :गडचिरोली जिल्ह्याच्या दळणवळणासाठी ‘जीवनवाहिनी’ मानल्या जाणाऱ्या आलापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या ६ वर्षांपासून रखडले आहे. दर्जाहीन काम, भ्रष्टाचार आणि अनियमिततेमुळे सर्वसामान्य नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गाचे अधीक्षक अभियंता विवेक नवले आणि एक्झिक्यूटिव्ह इंजिनिअर प्रफुल केळकर यांनी महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली.पाहणीदरम्यान संतप्त नागरिक आणि प्रवाशांनी अधिकाऱ्यांना थेट गाठून रस्त्याच्या भीषण दुरवस्थेवरून जाब विचारला.
गेल्या ६ वर्षांपासून रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार सुरू असून जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. याप्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित कंत्राटदार आणि दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.
आता फक्त पाहणीचे नाटक आणि पोकळ आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून महामार्ग लवकरात लवकर वाहतुकीसाठी पूर्ववत खुला करावा.
तेलंगणातून आलेल्या अधिकाऱ्यांना प्रवाशांचा सवाल
पाहणीदरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली. अधीक्षक अभियंता विवेक नवले व इंजिनिअर प्रफुल केळकर हे या पाहणीसाठी तेलंगणा राज्यातून आले होते.यावर उपस्थितांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
“साहेब, तुम्ही पाहणीसाठी तेलंगणातून एखाद वेळेस येता; पण आम्हाला दररोज या खड्डेमय रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो!” असा संतप्त सवाल प्रवाशांनी केला.
महामार्ग की ‘खड्ड्यांचे संग्रहालय’?
स्थानिकांनी अधिकाऱ्यांसमोर आपल्या दैनंदिन हाल-अपेष्टांचा पाढा वाचला शाळा-कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेवर पोहोचता येत नाही.
जीवावर बेतणारा प्रवास भोगावा लागत आहे.गर्भवती महिला आणि गंभीर रुग्णांना वेळेत रुग्णालयात नेणे कठीण झाले असून, रुग्णवाहिकाही खड्ड्यांत अडकत आहेत.
मालवाहतूक ठप्प झाल्याने स्थानिक शेतकरी व व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.“हा राष्ट्रीय महामार्ग आहे की खड्ड्यांचे संग्रहालय, हेच समजत नाही!” अशी उद्विग्न प्रतिक्रिया यावेळी प्रवाशांनी दिली.
तीव्र आंदोलनाचा इशारा
पाहणीनंतर अधीक्षक अभियंता नवले यांनी कामाला गती देण्याचे व दर्जा सुधारण्याचे नेहमीप्रमाणे आश्वासन दिले. मात्र, गेल्या ६ वर्षांच्या कटू अनुभवामुळे नागरिकांचा या आश्वासनांवर अजिबात विश्वास राहिलेला नाही.रस्त्याचे काम त्वरित पूर्ण न झाल्यास आणि दोषींवर कारवाई न झाल्यास राष्ट्रीय महामार्गावर लोकशाही मार्गाने तीव्र रस्ता रोको आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी व प्रवाशांनी दिला आहे.
आलापल्ली-सिरोंचा हा राष्ट्रीय महामार्ग तेलंगणा व छत्तीसगड या दोन राज्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे संपूर्ण क्षेत्राचा विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे.




