प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आल्लापल्ली च्या लेकाची ऐतिहासिक कामगिरी; इंग्लंडच्या डरहम क्रिकेट बोर्डाकडून रोहितला बोलावणे!

0
8

मिलिंद खोंड

अहेरी:

गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एका गुणवान क्रिकेटपटूने आपल्या अचूक आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर थेट सातासमुद्रापार झेप घेतली आहे. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग ‘आयपीएल’मध्ये राजस्थान रॉयल्सचा नेट गोलंदाज म्हणून कसब दाखवल्यानंतर, आलापल्ली येथील रोहित राठोड याची आता थेट इंग्लंडमधील प्रतिष्ठित अशा ‘डरहम क्रिकेट बोर्डा’तर्फे काउंटी क्रिकेट ट्रायल्स आणि नेट बॉलिंगसाठी अधिकृत निवड झाली आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे गडचिरोली जिल्ह्याचा नावलौकिक आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे.

अचूक टप्प्याची गोलंदाजी आणि अष्टपैलू कामगिरी

रोहित राठोड हा उजव्या हाताचा भेदक आणि वेगवान गोलंदाज असून, त्याच्या अचूक टप्प्यावरील गोलंदाजी व अष्टपैलू कामगिरीची दखल थेट इंग्लंडच्या डरहम क्रिकेट बोर्डाने घेतली आहे. बोर्डाकडून त्याला नुकतेच निवडीचे अधिकृत पत्र प्राप्त झाले आहे. या ऐतिहासिक निवडीमुळे रोहितला थेट इंग्लंडच्या भूमीवर जाऊन आपली वेगवान गोलंदाजी चमकवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

घरची पार्श्वभूमी आणि क्रिकेटचा प्रवास

आलापल्ली येथील रोहितचे वडील वन विभागात कार्यरत असून, रोहितला लहानपणापासूनच क्रिकेटची प्रचंड आवड आहे. यापूर्वी त्याने विद्यापीठ स्तरीय आणि महाविद्यालय स्तरीय अशा अनेक मानाच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून, प्रत्येक स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट प्रतिभेची चमक दाखविली आहे.

आयपीएलमध्येही दाखवले होते कसब

रोहितची क्रिकेटमधील कामगिरी यापूर्वीही राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय ठरली आहे. जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील ‘राजस्थान रॉयल्स’ संघासाठी देखील त्याची नेट गोलंदाज (Net Bowler) म्हणून निवड झाली होती, जिथे त्याला दिग्गज खेळाडूंना गोलंदाजी करण्याचा अनुभव मिळाला.

हैदराबादमधील ट्रायल ठरली टर्निंग पॉईंट

आपली मेहनत, चिकाटी आणि सातत्य या गुणांच्या भरवशावर रोहितची निवड ‘आर्मड फोर्सेस’साठी (Armed Forces) झाली होती. त्यांच्यातर्फे हैदराबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष ट्रायलमध्ये रोहितने आपल्या गोलंदाजीने निवडकर्त्यांना प्रभावित केले. याच ट्रायलमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर त्याची आता इंग्लंडमधील ‘डरहम क्रिकेट बोर्डा’त नेट गोलंदाज म्हणून निवड झाली आहे.

६ ते १६ ऑगस्ट दरम्यान इंग्लंडमध्ये सामने व ट्रायल्स

डरहम क्रिकेट बोर्डाने पाठवलेल्या पत्रानुसार, रोहितची ही निवड ६ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत इंग्लंडमध्ये होणाऱ्या देशांतर्गत क्रिकेट सामन्यांसाठी, तसेच महत्त्वाच्या ट्रायल्स आणि नेट गोलंदाजीसाठी करण्यात आली आहे. या दौऱ्यादरम्यान त्याचा प्रवास, निवास, भोजन आणि स्थानिक वाहतुकीचा सर्व खर्च व्यवस्थापनातर्फे केला जाणार आहे.

. ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत थेट इंग्लंड वारी करणाऱ्या रोहितवर सध्या सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत असून, आलापल्ली परिसरातील संपूर्ण क्रिकेट वर्तुळातून त्याचे जोरदार अभिनंदन केले जात आहे.