अहेरी वन परिक्षेत्रातील राखीव वन क्षेत्रावरील अतिक्रमणावर वन विभागाची मोठी कारवाई

0
2

कक्ष क्रमांक १२ मधील ३० ते ३५ हेक्टर अतिक्रमित वन क्षेत्र केले मुक्त; १५० वनकर्मचारी, पोलीस आणि महसूल विभागाची संयुक्त कारवाई

अहेरी:

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी वन परिक्षेत्रांतर्गत कक्ष क्रमांक १२ च्या राखीव वन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर झालेल्या अतिक्रमणाविरुद्ध वन विभागाने मंगळवारी व्यापक आणि सुनियोजित कारवाई करत सुमारे ३० ते ३५ हेक्टर वन जमीन अतिक्रमणमुक्त केली. वनसंपदेचे जतन आणि पर्यावरण सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई एक महत्त्वाचे पाऊल मानली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ताणबोडी गावाजवळ असलेल्या राखीव वन क्षेत्रात सुमारे पाच ते सहा महिन्यांपूर्वी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना नवीन अतिक्रमण दिसून आले होते. त्या वेळी वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र कारवाईदरम्यान त्यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती. यामुळे त्या वेळी अतिक्रमण निष्कासनाची कारवाई पूर्ण होऊ शकली नव्हती.या वेळी वन विभागाने पूर्ण तयारीनिशी पोलीस आणि महसूल विभागाच्या सहकार्याने संयुक्त मोहीम राबवली. कारवाई दरम्यान चार जेसीबी मशीनच्या साहाय्याने अतिक्रमित क्षेत्राच्या सीमा निश्चित करून वन जमीन मुक्त करण्यात आली.

वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि समन्वय

ही मोहीम मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) गजेंद्र नरवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. तर, सहाय्यक वनसंरक्षक शिशुपाल पवार यांनी संपूर्ण कारवाईचे समन्वय केले.

१५० हून अधिक कर्मचाऱ्यांचा सहभाग

या कारवाईत वन विभागाचे सुमारे १५० कर्मचारी सहभागी झाले होते. अहेरी, पेरमिली आणि आलापल्ली वन परिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे या मोहिमेत भाग घेतला. या वेळी अहेरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी नारायण इंगळे, पेरमिलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी चौके आणि आलापल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव गणवीर प्रामुख्याने उपस्थित होते.

पोलीस व महसूल विभागाचे सहकार्य

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या नेतृत्वाखाली चोख सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली होती. तसेच, महसूल विभागाच्या वतीने नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांनी आवश्यक ते प्रशासकीय सहकार्य केले.

वन विभागाचा इशारा:

“राखीव वन क्षेत्रांवर कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही आणि भविष्यातही अशा प्रकरणांमध्ये नियमानुसार कठोर कारवाई सुरूच राहील.”

या प्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी नारायण इंगळे यांनी नागरिकांना पर्यावरण संरक्षणात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. त्यांनी “झाडे लावा, झाडे जगवा” असा संदेश देत जंगल आणि वनसंपदेच्या रक्षणासाठी वन विवागाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.वनसंपदेची सुरक्षा, पर्यावरणीय समतोल राखणे आणि भावी पिढ्यांसाठी नैसर्गिक संसाधनांचे जतन करण्याच्या दिशेने अहेरी वन परिक्षेत्राची ही कारवाई एक अत्यंत महत्त्वाची आणि कौतुकास्पद मोहीम मानली जात आहे