अहेरी
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यांतर्गत येणाऱ्या शिवनीपाठ येथील शिक्षक व संवेदनशील साहित्यिक रवींद्र रत्नाकर यमसलवार लिखित पाच महत्त्वाच्या शैक्षणिक आणि संस्कारप्रधान पुस्तकांचे नुकतेच भामरागड व अहेरी येथे आयोजित वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये प्रकाशन करण्यात आले. शिक्षण आणि संस्कारांच्या समन्वयाव र आधारित या पुस्तकांचे शिक्षक, विद्यार्थी तसेच साहित्यप्रेमींकडून विशेष कौतुक होत आहे.
दोन टप्प्यांत संपन्न झाला पुस्तक प्रकाशन सोहळा
रवींद्र यमसलवार यांच्या पुस्तकांचा विमोचन सोहळा दोन महत्त्वपूर्ण कार्यक्रमांच्या माध्यमातून पार पडला.
भामरागड(हेमलकसा) येथील लोक बिरादरी प्रकल्पात आयोजित कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ समाजसेवक व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते ‘भारतीय संस्कृतीचा वारसा’ आणि ‘शालेय परिपाठ’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
अहेरी येथील जिल्हा सहकारी पतसंस्था सभागृहात आयोजित सोहळ्यात ‘संस्कारक्षम बोधकथा’, ‘मराठी बोधकथा’ आणि ‘मराठी व्याकरण’ या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
अनेक शिक्षणतज्ज्ञ आणि मान्यवरांची उपस्थिती
अहेरी येथे आयोजित सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त शिक्षक विनोद भोसले होते. या कार्यक्रमाला पंचायत समिती अहेरीचे गटशिक्षणाधिकारी सुनीलभाऊ आईंचवार, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ. प्रवीण पुल्लूरवार, खुर्शीद शेख तसेच सेवानिवृत्त शिक्षक बबलू सडमेक प्रामुख्याने उपस्थित होते.याशिवाय, राजूभाऊ आत्राम, लक्ष्मणभाऊ गद्देवार, राम पुलगमकर आणि समाजसेवक महेशभाऊ बेझंकीवार यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक, साहित्यप्रेमी व नागरिक या सोहळ्याला उपस्थित होते.
आपल्या मनोगतात लेखक रवींद्र यमसलवार म्हणाले की,
“शिक्षण हे केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, नैतिक मूल्ये आणि जीवन कौशल्यांचा विकास करणेही तितकेच आवश्यक आहे.”
ही पाचही पुस्तके विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात मदत करतील आणि शिक्षकांसाठीही मार्गदर्शक ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांनी रवींद्र यमसलवार यांच्या शैक्षणिक व साहित्यिक योगदानाचे कौतुक केले. अशी पुस्तके विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व घडणीत आणि समाजात सकारात्मक मूल्यांचा प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, असा सूर मान्यवरांनी काढला. तसेच त्यांनी लेखकाला त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रभावी संचालन प्रमोद रोहनकर यांनी केले, तर यमाजी मुंजमकर यांनी उपस्थित सर्व अतिथी व नागरिकांचे आभार मानले.





