अहेरी : बळीराजाचा खरा सोबती आणि शेतीचा मुख्य आधार असलेल्या गोधनाचा कृतज्ञता सोहळा म्हणजेच ‘बैलपोळा’ सण आज अहेरी तालुक्यातील नागेपल्ली या गावात पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्षभर शेतात काबाडकष्ट करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गावातील शेतकरी बांधवांनी सकाळपासूनच मोठा उत्साह दाखवला.
सणाच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी बैलांना स्वच्छ आंघोळ घातली. त्यानंतर त्यांच्या अंगावर विविध रंगांचे ठिपके देऊन, शिंगांना हिंगूळ व आकर्षक रंग फासून, पाठीवर नक्षीदार झूल, गळ्यात घुंगरांच्या माळा, कपाळावर बाशिंग आणि पायात चाळ बांधून देखणा साज चढवला. सजवलेल्या बैलांचे रूप सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. घरोघरी महिला भगिनींनी पुरणपोळीचा नैवेद्य तयार करून बैलांची मनोभावे पूजा केली व त्यांना गोड घास भरवला.
सायंकाळी गावातील ग्रामदैवत श्री हनुमान मंदिर परिसरात पारंपरिक पोळा भरवण्यात आला. यावेळी हनुमान मंदिर, नागेपल्ली यांच्या वतीने ‘पर्यावरणपूरक व सनातनी संस्कृती’ या संकल्पनेवर आधारित विशेष बैलपोळा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गावातील सर्व शेतकरी आपल्या सजवलेल्या बैलजोड्या घेऊन वाजतगाजत हनुमान मंदिरासमोर एकत्र आले. या ठिकाणी गावातील प्रतिष्ठित नागरिक, अबालवृद्ध, महिला भगिनी व बालगोपाळांनी मोठी गर्दी केली होती.
या स्पर्धेत उत्कृष्ट व आकर्षक सजावट केलेल्या बैलजोड्यांना माजी राज्यमंत्री राजे अमरीशराव आत्राम यांच्या पुढाकारातून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
पोळ्याच्या मुख्य आकर्षणाचा भाग असलेल्या पारंपरिक ‘झडत्या’ (पोळ्याची कवने) मोठ्या आवाजात आणि उत्साहात गायल्या गेल्या. शेतकऱ्यांनी आणि तरुणांनी सादर केलेल्या झडत्यांना उपस्थितांनी टाळ्या वाजवून उत्स्फूर्त दाद दिली. ढोल-ताशांच्या तालावर लहान मुलांनी व तरुणांनी ठेका धरला. मंदिरासमोर बैलांना प्रदक्षिणा घालून देवाचे आणि सर्जाराजाचे आशीर्वाद घेण्यात आले. तोरणे तोडण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर उपस्थितांना प्रसाद वाटप करण्यात आले.
दरम्यान बालगोपाळांसाठी ‘तान्हा पोळा स्पर्धा’ भरवण्यात येणार असून त्यातही प्रथम, द्वितीय व तृतीय रोख पारितोषिके दिली जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. नागेपल्लीसारख्या ग्रामीण भागात परंपरेचा हा वारसा नव्या पिढीनेही तेवढ्याच आपुलकीने जपल्याचे आजच्या सोहळ्यावरून दिसून आले.




