अहेरी:
वनसंरक्षण आणि वनसंवर्धनाचे कर्तव्य बजावत असताना प्राणांची आहुती देणाऱ्या वनअधिकारी, वनकर्मचारी व वनमजुरांच्या स्मृतीस उजाळा देण्यासाठी आलापल्ली येथील वनसंपदा मुख्यालयात ‘राष्ट्रीय वनशहीद दिन’ अत्यंत भावूक व आदरयुक्त वातावरणात साजरा करण्यात आला. आलापल्ली, भामरागड, सिरोंचा आणि वन्यजीव वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते वन शहीद स्मारका वर पुष्पचक्र वाहून शहीदांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १ मिनिटाचे मौन बाळगून हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून भामरागडचे उपवनसंरक्षक शैलेश मीना,याशिवाय सिरोंचाचे उपविभागीय वन अधिकारी श्री. विष्णू रेड्डी , भामरागडचे सहाय्यक वनसंरक्षक श्री. रामटेके (म.व.से.), आलापल्ली (वन्यजीव) उपविभागीय वन अधिकारी श्री. बाळापुरे (म.व.से.), तसेच वनशहीद स्मारक समितीचे अध्यक्ष श्री. बुद्धावार आणि सचिव श्री. संजय रामगुंडेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
वनशहीद कुटुंबांचा गौरव व मदत: वनरक्षणात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या शहीद कुटुंबांप्रती कृतज्ञता व्यक्त करत मान्यवरांच्या हस्ते शहीद कुटुंबातील महिलांना श्रीमती अरुणा राजकुमार पेडीचर्ला, श्रीमती लक्ष्मी अशोक अर्का, श्रीमती समक्का महेश मेकला, श्रीमती शितल साईदास चिचघरे, श्रीमती वैशाली गौतम दुर्गे, श्रीमती मदनय्या गोरा, श्रीमती बाबुराव आत्राम व इतर) साडी-चोळी भेट देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच या प्रसंगी LIC जीवन सुरक्षा व आरोग्याशी संबंधित उपक्रमांची माहिती देण्यात आली.
सूत्रसंचालन व आभार: कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनरक्षक श्री. एन. एम. टेकाम यांनी अत्यंत प्रभावीपणे केले, तर उपस्थितांचे आभार वनपाल श्री. ईश्वर मांडवकर यांनी मानले. या कार्यक्रमास अलापल्ली, भामरागड, सिरोंचा व वन्यजीव वनविभागातील अधिकारी, कर्मचारी आणि शहीद कुटुंबातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.




