अहेरीत खाकी वर्दीतील ‘देवदूत’ धावला; CRPF जवानाने रक्तदान करत वाचवला १४ वर्षीय चिमुरडीचा जीव.

0
3
Oplus_16908288

अहेरी (प्रतिनिधी)
देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी सदैव सीमेवर व दुर्गम भागात तैनात असणारे आपले जवान केवळ देशाचे रक्षणच करत नाहीत, तर संकटसमयी सामान्य नागरिकांचे ‘रक्षक’ म्हणूनही धावून येतात, याची प्रचिती पुन्हा एकदा अहेरी येथे आली आहे. येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) ९ व्या बटालियनमधील एका जवानाने ऐनवेळी रक्तदान करून एका १४ वर्षीय मुलीचा जीव वाचवला. या मानवतावादी कृत्यामुळे परिसरासह पोलीस दलात जवानाचे मोठे कौतुक होत आहे.

१४ वर्षीय मुलगी तीव्र ॲनिमियाने होती ग्रस्त.

माहितीनुसार, सिरोंचा तालुक्यातील चिकेला येथील रहिवासी कुमारी आलेख्या दिलीप बामनपल्ली (वय १४ वर्षे) ही तीव्र ॲनिमियाने ग्रस्त होती. तिच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण अवघे ६.५ ग्रॅम/डीएल इतके कमी झाल्यामुळे तिला उपचारासाठी अहेरी येथील उप-जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी तातडीने एका युनिट रक्ताची आवश्यकता असल्याचे कुटुंबीयांना सांगितले. मात्र, वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्याने नातेवाईक हवालदील झाले होते.
जवानाची तत्परता ठरली मोलाची

या गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच, ९ व्या बटालियन सीआरपीएफचे कॉन्स्टेबल/जीडी अजय लहरी (फोर्स क्र. १७५०९४५०९) यांनी कोणताही विलंब न लावता स्वतःहून पुढे येत रक्तदान करण्याची तयारी दर्शवली. त्यांनी तात्काळ रुग्णालयात जाऊन १ युनिट रक्त दान केले. जवानाच्या या वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे चिमुरड्या आलेख्याच्या उपचाराला गती मिळाली आणि तिचा जीव वाचला.
**सर्वत्र कौतुकाचा वर्षाव**
सीआरपीएफ जवानांचे हे कृत्य केवळ देशसेवेचीच नव्हे, तर सर्वोच्च जनसेवेची साक्ष देणारे आहे. या संकटसमयी वेळेवर रक्त उपलब्ध करून दिल्याबद्दल चिमुरड्या आलेख्याच्या पालकांनी तसेच उप-जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी कॉन्स्टेबल अजय लहरी आणि ९ व्या बटालियनचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. जवानाच्या या प्रेरणादायी कृत्यामुळे समाजात ऐच्छिक रक्तदानाबाबत सकारात्मक संदेश गेला आहे.