22 जुलैला अहेरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर ..नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन.

0
4

अहेरी :

नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी, जलद आणि पारदर्शक पद्धतीने मिळावा या उद्देशाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात २२, २५ आणि २६ जुलै या तीन दिवसांपैकी एका दिवशी हे शिबिर आयोजित करण्यात येत आहे. त्यानुसार अहेरी विधानसभा क्षेत्रात २२ जुलै रोजी वासवी सभागृहात भव्य समाधान शिबिर पार पडणार असून, त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. या शिबिरात प्रत्येक विभागाने स्वतंत्र स्टॉल उभारून शासनाच्या विविध योजना, सेवा आणि लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना देण्यात आल्या. शिबिरात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला शक्य तितक्या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी विभागनिहाय नियोजन करण्याचे निर्देशही देण्यात आले. अहेरी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या पाचही तालुक्यांतील महसूल, पंचायत राज, कृषी, आरोग्य, महिला व बालविकास, समाजकल्याण, आदिवासी विकास, बँका तसेच इतर सर्व संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत. त्यासोबत नागरिकांना विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी प्रदर्शनी लावण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना विविध कार्यालयांचे हेलपाटे न मारता एकाच ठिकाणी अनेक शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ मिळणार आहे.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासनाने सर्व विभागांना आवश्यक तयारी पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून, लाभार्थ्यांची माहिती, अर्ज, आवश्यक कागदपत्रे आणि विविध योजनांची अंमलबजावणी याबाबतही नियोजन करण्यात आले आहे.दरम्यान, या उपक्रमात लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांचा सहभाग वाढावा यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची विशेष बैठक आयोजित करून शिबिराचे नियोजन, जनजागृती आणि नागरिकांचा अधिकाधिक सहभाग यावर चर्चा होणार आहे. उपविभागीय अधिकारी प्रशांत पिसाळ,अहेरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील सर्व नागरिकांनी २२ जुलै रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या या भव्य महसूल समाधान शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.