अहेरी :
चामोर्शी तालुक्यातील रहिवासी व सध्या आलापल्ली येथे भाड्याच्या खोलीत राहून सुरजागड कंपनीच्या खमनचेरू स्टॉकयार्डमध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर ची नोकरी करणाऱ्या एका २६ वर्षीय युवतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना बुधवार, १५ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास मौजा आलापल्ली येथे घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्नेहा हिवराज कुमरे (वय २६, रा. मार्कडा, ता. चामोर्शी, ह.मु. आलापल्ली) असे मृत युवतीचे नाव आहे.
प्रेमसंबंधातून लग्न ठरले होते, मात्र…
मिळालेल्या माहितीनुसार, मृत स्नेहा कुमरे ही खमनचेरू येथील सुरजागड कंपनीच्या स्टॉकयार्डमध्ये कार्यरत होती. तिचे मागील तीन महिन्यांपासून तिथेच पोकलेन चालक म्हणून काम करणाऱ्या राहुल रंगाराव घरात (वय २७, रा. चंद्रपूर) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. या दोघांच्याही नातेवाईकांनी त्यांच्या प्रेमसंबंधाला होकार देत, रीतीरिवाजाप्रमाणे लग्न लावून देण्याचे ठरवले होते. सर्व काही सुरळीत सुरू असतानाच स्नेहाने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
घरमालकिणीच्या फोननंतर घटना उघडकीस
बुधवार, १५ जुलै रोजी रात्री १०:४० वाजताच्या सुमारास स्नेहा राहत असलेल्या खोलीच्या घरमालकिणीने तिच्या आईला (फिर्यादी शिला हिवराज कुमरे) फोन करून माहिती दिली की, स्नेहाने खोलीतील सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला आहे. या घटनेची माहिती मिळताच आई व नातेवाईकांनी तातडीने आलापल्ली गाठले.घटनास्थळी अहेरी पोलीस आणि नातेवाईकांच्या मदतीने स्नेहाला खाली उतरवून तात्काळ उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती गुरुवारी (१६ जुलै) पहाटे १:०० वाजताच्या सुमारास तिला मृत घोषित केले.
पोलीस ठाण्यात ‘मर्ग’ दाखल
या प्रकरणी मृत स्नेहाची आई शिला हिवराज कुमरे (वय ५३, रा. मार्कडा, ता. चामोर्शी) यांच्या तोंडी रिपोर्टवरून आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या मेमोच्या (MLC) आधारे अहेरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू खबरी क्रमांक ३१/२०२६, कलम १९४ बी.एन.एस.एस. (BNSS 2023) अन्वये मर्ग दाखल करण्यात आला आहे.अहेरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक हर्षल ऐकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिनेश येवले आणि महिला पोलीस नाईक मनिषा मुलकवार पुढील तपास करीत आहेत.




