१.६२२ किलो गांजासह आलापल्लीतील पानटपरी चालक जेरबंद! अहेरी पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई; आरोपीला १४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

0
13

अहेरी :

गडचिरोली जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात अहेरी पोलिसांनी रविवारी मध्यरात्री एक मोठी आणि धाडसी कारवाई केली आहे. आलापल्ली येथील बसस्थानकासमोरील एका पानटपरीवर टाकलेल्या छाप्यात १.६२२ किलो गांजा आणि गांजा ओढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ४० मातीच्या चिलमींसह एकूण ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पानटपरी चालकाला रंगेहात अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला १४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी (PCR) सुनावली आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे रचला सापळा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आलापल्ली येथील बस स्टॉपसमोरील ‘गोपाल पान सेंटर अँड कोल्ड्रिंक्स’ या दुकानात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे अमली पदार्थांची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती अहेरी पोलिसांना मिळाली होती. माहितीची पूर्ण खातरजमा केल्यानंतर, अहेरी पोलीस निरीक्षक हर्षल एकरे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) देवेंद्र चुनीलाल पटले यांच्या नेतृत्वात पोलिसांनी रणनीती आखली. १२ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री १२:०९ ते पहाटे ०१:३० वाजताच्या दरम्यान या दुकानात नियोजनबद्ध छापा टाकण्यात आला.३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

दुकानाची कसून झडती घेतली असता, पोलिसांना गांजा हिरवी पाने, फुले आणि बोंडे असलेला १.६२२ किलो गांजा (अंदाजे किंमत २०,००० रुपये प्रति किलोप्रमाणे एकूण ३२,००० रुपये).

चिलमी गांजा पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ४० नग मातीच्या चिलमी (एकूण किंमत ४०० रुपये).

पोलिसांच्या या धडक कारवाईत एकूण ३२,४०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखलयाप्रकरणी आरोपी गोपाल नवकुमार बिश्वास (वय ४५ वर्षे, रा. बस स्टॉपसमोर, आलापल्ली) याच्याविरुद्ध अहेरी पोलीस ठाण्यात अमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (NDPS Act) च्या कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब) अन्वये अप क्र. २१४/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

अटक करण्यात आलेल्या आरोपी गोपाल बिश्वास याला अहेरी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी आरोपीची १४ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.सदर यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक हर्षल एकरे, सपोनि देवेंद्र पटले यांनी केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि मंगेश वळवी करत आहेत. अमली पदार्थ विक्रीच्या या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा हात आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.