वडिलांच्या निधनाचा आघात आणि परदेशातील संघर्षावर डॉ. साक्षी मद्दर्लवार यांची मात; ‘FMGE’ उत्तीर्ण होऊन भारतात वैद्यकीय सेवेसाठी सज्ज

0
4

अहेरी

स्वप्न मोठे असेल तर संकटेही मोठी असतात. मात्र, त्या संकटांवर जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मात करता येते, हे गडचिरोली जिल्ह्यातील डॉ. साक्षी किशोर मद्दर्लवार यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. रशियातील नामांकित ‘प्रिव्होल्झस्की रिसर्च मेडिकल युनिव्हर्सिटी’ (Privolzhsky Research Medical University, Nizhny Novgorod) येथून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी भारतातील अत्यंत कठीण मानली जाणारी ‘एफएमजीई’ (Foreign Medical Graduate Examination) परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आहे. यामुळे त्यांचे बालपणीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार झाले आहे.लहानपणापासूनच वैद्यकीय क्षेत्रात काम करून समाजसेवा करण्याचे ध्येय डॉ. साक्षी यांनी मनाशी बाळगले होते. मुलीची हीच ओढ पाहून त्यांच्या आई-वडिलांनी आणि भावाने त्यांच्यावर खंबीर विश्वास दाखवला आणि त्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी रशियाला पाठवण्याचा धाडसी निर्णय घेतला. कुटुंबाच्या याच पाठिंब्याने त्यांच्या स्वप्नांना पंख दिले.

परदेशातील आव्हाने आणि रशियन भाषेवर प्रभुत्व

परदेशात गेल्यानंतर भाषा, संस्कृती, हवामान आणि संपूर्णपणे नवीन वातावरणाशी जुळवून घेणे हे साक्षी यांच्यासाठी मोठे आव्हान होते. विशेषतः रशियन भाषा शिकणे सुरुवातीला अत्यंत कठीण वाटले. मात्र, भाषा शिकल्याशिवाय वैद्यकीय शिक्षण घेणे शक्य नव्हते. यामुळे सातत्यपूर्ण अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी रशियन भाषेवर उत्तम प्रभुत्व मिळवले आणि वैद्यकीय शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.

वडिलांच्या निधनाचा आघात; तरीही मानली नाही हार

सहा वर्षांच्या या शैक्षणिक प्रवासात साक्षी यांच्या आयुष्यात एक अत्यंत दुःखद घटना घडली. एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात असतानाच त्यांच्या वडिलांचे छत्र हरपले. वडिलांच्या निधनाच्या या प्रचंड धक्क्याने त्या पूर्णपणे खचून गेल्या होत्या. परदेशात एकटे असताना आलेल्या या मानसिक संकटासमोर हार न मानता, त्यांनी वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला सावरले. अधिक जिद्दीने अभ्यास करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. हा संघर्ष त्यांच्या यशाला अधिक प्रेरणादायी बनवणारा ठरला.

पुढील वाटचाल आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा

रशियातील शिक्षणाने त्यांना वैद्यकीय ज्ञानाबरोबरच शिस्त, संयम, कठोर परिश्रम आणि जागतिक दृष्टिकोन दिला. पदवीदानाचा क्षण हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण ठरला. त्यानंतर भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेली ‘एफएमजीई’ परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, आता त्या इंटर्नशिप, वैद्यकीय परवाना प्रक्रिया आणि पुढील पदव्युत्तर (PG) शिक्षणासाठी सज्ज झाल्या आहेत.डॉ. साक्षी यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल गडचिरोली जिल्ह्यात सर्व स्तरातून त्यांचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी नक्कीच एक आशेचा किरण आणि मोठी प्रेरणा ठरणार आहे.

“आजचा संघर्षच उद्याच्या यशाचा पाया”

“परदेशात राहून शिक्षण घेणे, कुटुंबापासून दूर राहणे आणि त्यातच वडिलांच्या निधनाचा आघात सहन करणे अजिबात सोपे नव्हते. पण माझी आई, दिवंगत वडील आणि भाऊ यांनी दिलेल्या विश्वासामुळे मी कधीही हार मानली नाही. विद्यार्थ्यांना मला एवढेच सांगायचे आहे की, स्वतःवर विश्वास ठेवा, सातत्य आणि शिस्त कायम ठेवा. इतरांशी तुलना करू नका, कारण प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. आजचा संघर्षच उद्याच्या यशाचा पाया रचतो.”

डॉ. साक्षी मद्दर्लवार