गडचिरोली काँग्रेसमध्ये ‘हायव्होल्टेज ड्रामा’! एका बाजूला नवख्यांचं शक्तिप्रदर्शन, दुसऱ्या बाजूला जुन्यांचा सामूहिक राजीनामा

0
507

गडचिरोली:27 मे

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये अंतर्गत वादाचा मोठा भडका उडाला आहे. नुकत्याच झालेल्या संघटनात्मक फेरबदलात तत्कालीन जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या जागी ॲड. विश्वजीत कोवासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे नाराज झालेल्या जिल्ह्यातील प्रमुख तालुकाध्यक्षांसह अनेक वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सामूहिक राजीनामा सादर केला आहे. यासंदर्भातील एक पत्र सध्या समोर आले असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळबळ उडाली आहे.

महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या कामाची पावती व नाराजीचे कारण

पत्रात नमूद केल्यानुसार, २०१४ ते २०२४ या काळात जेव्हा गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचा एकही आमदार किंवा खासदार निवडून आला नव्हता आणि अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करत होते, अशा कठीण परिस्थितीत महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. त्यांनी शेतकरी, युवक, महिला आणि जनसामान्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलने व मोर्चे काढून पक्ष संघटना मजबूत केली. त्यांच्या याच कष्टांमुळे २०२४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेसचे खासदार आणि आमदार निवडून आले.अशा कर्तव्यनिष्ठ नेत्याला अचानक जिल्हाध्यक्षपदावरून दूर केल्यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

‘सोशल इंजिनिअरिंग’ आणि ओबीसी प्रतिनिधित्वाचा मुद्दा

नाराज कार्यकर्त्यांनी पत्रात सामाजिक संतुलनाचा मुद्दा प्रकर्षाने मांडला आहे. गडचिरोली हा आदिवासी बहुल जिल्हा असला तरी येथे मोठ्या प्रमाणात ओबीसी (OBC) समाजही राहतो. जिल्ह्यातील तीनही विधानसभा आणि एक लोकसभा जागा अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी राखीव असल्याने ओबीसी समाजाला राजकीय नेतृत्वाची संधी मर्यादित मिळते.महेंद्र ब्राह्मणवाडे हे ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करत असल्याने त्यांच्या माध्यमातून मोठा ओबीसी वर्ग काँग्रेसशी जोडला गेला होता. मात्र, नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे हे आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करत असल्याने आता जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि पक्ष संघटनेतील महत्त्वाची पदे एकाच समाजाकडे गेल्याची भावना निर्माण झाली आहे. यामुळे ओबीसी कार्यकर्ते आणि पदाधिकारी कमालीचे नाराज झाले आहेत.

मागणी मान्य न झाल्यास सामूहिक राजीनामे

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये पक्षाला बळकटी देण्यासाठी आणि जिल्ह्यात सामाजिक समतोल राखण्यासाठी महेंद्र ब्राह्मणवाडे यांना पुन्हा जिल्हाध्यक्षपदी कायम करण्यात यावे, अशी आग्रही मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. जर ही मागणी मान्य झाली नाही, तर जिल्ह्यात कार्यरत असलेले सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सामूहिक राजीनामे देतील, असा स्पष्ट इशारा पत्राच्या शेवटी देण्यात आला आहे सामूहिक राजीनाम्याच्या पवित्र्यामुळे आता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व यावर काय तोडगा काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असतानाच गडचिरोली काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. नवीन जिल्हाध्यक्ष निवडीवरून पक्षात उभी फूट पडली असून, एकाच वेळी ‘मशिनरी’ आणि ‘नाराजी’ दोन्हीचा स्फोट पाहायला मिळत आहे. १० तालुकाध्यक्षांसह तब्बल १०० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी थेट मुंबई गाठून सामूहिक राजीनामे दिल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

एका बाजूला जल्लोष: कोवासे यांचे दणदणीत शक्तिप्रदर्शन

युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव विश्वजित कोवासे यांची गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर, २६ मे रोजी त्यांच्या समर्थकांनी शहरात भव्य रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या पदग्रहण सोहळ्याला काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती यावेळी आमदार विजय वडेट्टीवार (विधीमंडळ गटनेते), माजी मंत्री वसंत पुरके, कुणाल चौधरी (महाराष्ट्र प्रभारी), आमदार अभिजित वंजारी, आणि माजी खासदार मारोतराव कोवासे आदींची उपस्थिती होती.

आता गडचिरोली काँग्रेस मधील सामूहिक राजीनाम्याच्या पवित्र्यामुळे आता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व यावर काय तोडगा काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.