नक्षल कमांडर हिडमाच्या गाण्यावर थिरकणे पडले महागात; एटापल्लीत पाच जणांवर गुन्हा दाखल

0
8

नक्षल कमांडर हिडमाच्या गाण्यावर थिरकणे पडले महागात; एटापल्लीत पाच जणांवर गुन्हा दाखल

गडचिरोली | प्रतिनिधी

नक्षलवादी संघटनेच्या कुख्यात कमांडरचे उदात्तीकरण करणाऱ्या गाण्यावर सार्वजनिक कार्यक्रमात नृत्य करणे पाच जणांना चांगलेच महागात पडले आहे. एटापल्ली तालुक्यातील कृष्णार येथे एका लग्नसमारंभात नक्षल कमांडर हिडमा माडवी याच्या जीवनावर आधारित गाणे वाजवून प्रक्षोभक विधाने केल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

लग्नसमारंभात रंगला नक्षली गाण्याचा ठेका

मिळालेल्या माहितीनुसार, ६ मे रोजी रात्री कृष्णार येथे एका विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात डी.जे.वर पारंपरिक गाणी सुरू असताना बाबुराव कांदो याने “पोलीस आदिवासी गावात कोणाच्या परवानगीने आले, नक्षलवादीच चांगले होते” अशी प्रक्षोभक विधाने करत उपस्थितांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर, “आपला नेता हिडमा आहे, त्याचेच गाणे लावा” असा हट्ट धरून वातावरण तणावपूर्ण करण्याचा प्रयत्न केला.

व्हिडिओ व्हायरल अन् पोलिसांची कारवाई

यानंतर चैतू रुषी तेलामी याने नक्षल कमांडर माडवी हिडमा याच्या जीवनावर आधारित गाणे डी.जे. ऑपरेटरकडे दिले. आर्यन हिचामी आणि शरद कांदो यांनी हे गाणे मोठ्या आवाजात वाजवले, ज्यावर सुमारे ४० ते ५० युवक-युवतींनी नृत्य केले. या संपूर्ण प्रकाराची चित्रफित (व्हिडिओ) ७ मे रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाली. पोलिसांनी या व्हिडिओची सखोल पडताळणी केली असता, त्यातील मजकूर नक्षलवाद्यांचे समर्थन करणारा आणि शासनविरोधी भावना भडकवणारा असल्याचे स्पष्ट झाले.

या पाच जणांवर गुन्हे दाखल

पोलीस शिपाई रोशन पुराम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि मुंबई पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये:१. शंकर हिचामी (डी.जे. मालक)२. बाबुराव कांदो३. चैतू रुषी तेलामी४. आर्यन हिचामी५. शरद कांदो (सर्व रा. कृष्णार) यांचा समावेश आहे.

राज्यात दुसरी घटना

नक्षल कमांडरच्या गाण्यावर गुन्हा दाखल होण्याची राज्यातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी पुण्यातील एका शासकीय वसतिगृहातही असाच प्रकार घडला होता. “समाजातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था बिघडवणाऱ्या कोणत्याही कृत्याची गय केली जाणार नाही,” असा कडक इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मच्छिंद्र नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.