अहेरी:
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील जनतेच्या सोयीसाठी आणि दळणवळण सुलभ व्हावे या उद्देशाने, जी/३७ समवाय कडून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. ‘नागरी कृती कार्यक्रम २०२५-२६’ अंतर्गत, कमांडंट श्री दव इंजीरकन किंडो यांच्या मार्गदर्शनाखाली कोठी येथे नवीन बसस्थानकाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून, २४ मार्च २०२६ रोजी त्याचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. प्रवाशांची गैरसोय टळणार कोठी आणि परिसरातील गावांमधील नागरिक तसेच शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बसची प्रतीक्षा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही गरज ओळखून जी/३७ समवायने हे बसस्थानक उभारले आहे. यामुळे आता प्रवाशांना सुरक्षित आणि सुव्यवस्थित प्रतीक्षा क्षेत्र उपलब्ध झाले असून, पावसाळा व उन्हाळ्यात होणारा त्रास कमी होणार आहे. मान्यवरांची उपस्थिती या उद्घाटन सोहळ्याला जी/३७ समवायचे अधिकारी इन्स्पेक्टर/जीडी सुखीराम, इन्स्पेक्टर/जीडी मधूकर देवरे, स्थानिक पोलीस दलाचे पीएसआय दिलीप गवळी आणि पीएसआय नंद किशोर प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच परिवहन विभागाचे कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ आणि सुरक्षा दलाचे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसहभागातून विकास या उपक्रमामुळे केवळ सार्वजनिक सुविधेचा विस्तार झाला नाही, तर सुरक्षा दल आणि स्थानिक जनता यांच्यातील विश्वास आणि सहकार्याचे नाते अधिक दृढ झाले आहे. ग्रामस्थांनी या लोकोपयोगी कामाबद्दल सुरक्षा दलाचे आभार मानले असून, या सुविधेमुळे कोठी परिसरातील प्रवासाचे चित्र बदलण्यास मदत होणार आहे.




