आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा अहेरी मतदारसंघासाठी मोठा ‘मास्टरस्ट्रोक’; रस्ते विकासासाठी २५ कोटींचा निधी मंजूर

0
2

अहेरी शहराच्या अंतर्गत रस्त्यांसह ग्रामीण भागातील दळणवळणाला मिळणार गती; अर्थसंकल्पातून खेचून आणला भरीव निधी

अहेरी (प्रतिनिधी):

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अहेरी विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी मोठे यश संपादन केले आहे. दक्षिण गडचिरोलीतील रस्ते विकासाचा वनवास संपवण्यासाठी त्यांनी तब्बल २५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करून घेतला असून, यामुळे अहेरी शहरासह दुर्गम भागातील रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे.

अहेरी शहरासाठी १० कोटींची तरतूद

गेल्या अनेक वर्षांपासून अहेरी शहराच्या अंतर्गत रस्त्यांच्या रुंदीकरणाची आणि मजबुतीकरणाची मागणी प्रलंबित होती. शहराच्या वाढत्या विस्तारानुसार पायाभूत सुविधांची गरज ओळखून, आमदार आत्राम यांनी विशेष पाठपुरावा करून अहेरी शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणाला आणि वाहतूक व्यवस्थेला नवी शिस्त लागणार आहे.

मुलचेरा-आलापल्ली मार्गाला दिलासा

राज्य मार्ग क्रमांक ३७० (चंद्रपूर-घंटाचौकी ते मुलचेरा मार्गे आलापल्ली) दरम्यान असलेल्या मार्कंडा (देव) ते गोमणी या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती. या मार्गावरून प्रवास करताना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. स्थानिकांच्या या मागणीची दखल घेत आ. आत्राम यांनी या तुकड्याच्या बांधकामासाठी १० कोटी रुपये मंजूर करून घेतले आहेत.

दुर्गम भागातील रस्तेही चकाकणार

केवळ शहरीच नव्हे तर अतिदुर्गम भागातील रस्तेही मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. सिरोंचा व अहेरी तालुक्यांतर्गत येणाऱ्या रोमपल्ली-झिंगानूर-कोपेला या जिल्हा मार्ग क्रमांक २६ च्या बांधकामासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

विकासाचे व्हिजन

अहेरी विधानसभा क्षेत्रातून सिरोंचा आणि भामरागडकडे जाणाऱ्या मार्गांची आधीच दर्जोन्नती होऊन ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वळवण्यात आले आहेत. त्यांचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र, या महामार्गांना जोडणारे राज्य व जिल्हा मार्ग सुस्थितीत असणे आवश्यक असल्याने आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी विशेष पुढाकार घेतला. एकूण २५ कोटींच्या या निधीमुळे संपूर्ण विधानसभा क्षेत्रात रस्ते विकासाचे जाळे निर्माण होणार आहे.

“मतदारसंघातील जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे ही माझी प्राथमिकता आहे. राष्ट्रीय महामार्गांसोबतच अंतर्गत रस्ते दर्जेदार असणे गरजेचे आहे. या २५ कोटींमुळे महत्त्वाच्या कामांना गती मिळेल आणि लवकरच इतरही प्रलंबित कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.” > — डॉ. धर्मरावबाबा आत्राम (आमदार, अहेरी विधानसभा क्षेत्र)