अबुझमाड चकमकीतील शहीद दीपक मडावी यांना साश्रू नयनांनी निरोप; १० वर्षांच्या चिमुरड्याचा सॅल्युट पाहून उपस्थितांचे हृदय हेलावले

0
15

गडचिरोली:

छत्तीसगड सीमावर्ती भागातील अबुझमाडच्या घनदाट जंगलात नक्षलवाद्यांशी दोन हात करताना वीरमरण आलेले सी-६० पथकाचे जवान दीपक चिन्ना मडावी (३८) यांच्या पार्थिवावर आज शुक्रवारी गडचिरोली पोलीस मुख्यालयात शासकीय इतमामात अंत्यसंस्कारापूर्वी मानवंदना देण्यात आली. या अत्यंत शोकाकुल वातावरणात आपल्या शहीद पित्याला कडेवर बसून सॅल्युट ठोकणाऱ्या चिमुकल्याचा व्हिडीओ आणि दृश्य पाहून उपस्थित जनसमुदायाचे डोळे पाणावले.हेलिकॉप्टरने पार्थिव गडचिरोलीत दाखलशहीद दीपक मडावी यांचे पार्थिव आज दुपारी विशेष हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे आणण्यात आले. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पार्थिव पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आणले गेले. येथे पोलिसांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून आपल्या वीर सहकाऱ्याला अखेरची मानवंदना दिली.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून श्रद्धांजलीयावेळी नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, आणि पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद मडावी यांना श्रद्धांजली वाहिली.

“दीपक मडावी यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत नक्षल्यांशी धैर्याने लढा दिला. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. शासन आणि पोलीस विभाग त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,” असे आश्वासन डॉ. रवींद्र सिंगल यांनी यावेळी दिले.

हृदयद्रावक दृश्य: मुलाचा सॅल्यूट आणि मातेचा आक्रोशमानवंदनेच्या वेळी मैदानावर अत्यंत हृदयद्रावक प्रसंग पाहायला मिळाला. शहीद दीपक मडावी यांच्या १० वर्षीय मुलाने नातेवाईकाच्या कडेवर बसून आपल्या वडिलांना अखेरचा सॅल्युट ठोकला. हे दृश्य पाहून तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा कंठ दाटून आला. आपल्या लाडक्या लेकाला निरोप देताना दीपक यांच्या वृद्ध मातेने फोडलेला टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता. धक्क्याने त्या बेशुद्ध पडल्या, त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यात आले.मूळ गावी होणार अंत्यसंस्कारपोलीस मुख्यालयातील शासकीय सोहळ्यानंतर शहीद दीपक मडावी यांचे पार्थिव त्यांच्या अहेरी तालुक्यातील दामरंचा या मूळ गावी रवाना करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली असून, एका शूर जवानाला महाराष्ट्र मुकला आहे.