गडचिरोली: 6 फेब्रुवारी
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील अबुझमाडच्या घनदाट जंगलात पोलीस आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत गडचिरोली पोलीस दलाच्या सी-६० पथकाने ३ माओवाद्यांना कंठस्नान घातले आहे. मात्र, या चकमकीत जवानांनी दाखवलेल्या शौर्याला मोठी किंमत मोजावी लागली असून,एका जवानाला वीरमरण आले आहे.
३ माओवाद्यांचा खात्मा, आधुनिक शस्त्रे जप्त
शुक्रवारी सकाळी घटनास्थळावरून शोध मोहिमेदरम्यान आणखी दोन माओवाद्यांचे (१ पुरुष व १ महिला) मृतदेह हस्तगत करण्यात आले. आतापर्यंत या मोहिमेत एकूण ३ माओवादी (२ पुरुष व १ महिला) ठार झाले आहेत. घटनास्थळावरून पोलिसांनी १ एके-४७ आणि १ एसएलआर रायफल यांसह मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य जप्त केले आहे. ठार झालेल्या माओवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू आहे.सी-६० जवानांना वीरमरण
या मोहिमेदरम्यान माओवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जवान गंभीर जखमी झाले होते.
दिपक चिन्ना मडावी (३८): मूळ गाव मांड्रा (ता. अहेरी) येथील रहिवासी असलेले दिपक मडावी यांना जंगलातून हेलिकॉप्टरने बाहेर काढून भामरागड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आणि त्यांना वीरमरण आले.
जोगा मडावी (रा. किष्टयापल्ली): या चकमकीत जखमी झालेल्या दुसऱ्या जवानालाही हेलिकॉप्टरने बाहेर काढण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली येथे हलवण्यात येणार आहे.दुर्गम भागात थरारक मोहीमअबुझमाडचा परिसर अत्यंत घनदाट आणि दुर्गम मानला जातो. या भागात माओवादी मोठ्या संख्येने जमल्याची माहिती मिळाल्यानंतर गडचिरोली पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली होती. रात्रीपासून सुरू असलेल्या या संघर्षात जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.
शोधमोहीम अद्याप सुरू:
“सदर जंगल परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू असून, अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे. या कारवाईबाबतची सविस्तर माहिती लवकरच अधिकृतरीत्या जाहीर केली जाईल,” अशी माहिती गडचिरोली पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.




