अहेरी येथे तालुका विज्ञान प्रदर्शनीचे उत्साहात उद्घाटन.

0
6

अहेरी :19डिसेंबर

द-गोटूल वृत्तसेवा

शिक्षण विभाग, पंचायत समिती अहेरी व भगवंतराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन शुक्रवार, दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी उत्साहात पार पडले.

या विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन तनुश्रीताई आत्राम (सिनेट सदस्या) यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. अब्दुल जमीर हकीम (सचिव, वनवैभव शिक्षण मंडळ, अहेरी) हे होते.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री. बालाजी सोमवंशी (तहसीलदार, अहेरी), श्री. दाते साहेब (नायब तहसीलदार), श्री. गणेश चव्हाण (गट विकास अधिकारी), श्री. निखिल गुरव (तालुका कृषी अधिकारी), सौ. शाहीनताई हकीम (अध्यक्षा, दृष्टी फाउंडेशन), प्राचार्य श्री. शाहीद शेख, श्री. सुनील आईंचवार (गट शिक्षणाधिकारी), डॉ. लुबना हकीम (वैद्यकीय अधिकारी, महागाव), श्री. उमेश चिलवेलवार (केंद्रप्रमुख), प्रा. डॉ. रमेश हलामी, प्राचार्य गजानन लोनबले व राहूड सर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात श्री. अब्दुल जमीर हकीम यांनी विज्ञान शिक्षणाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात विज्ञान व तंत्रज्ञानाशिवाय प्रगती शक्य नाही. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होणे ही काळाची गरज आहे. अशा विज्ञान प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांमधील कल्पकता, संशोधन वृत्ती व आत्मविश्वास वाढतो. विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न राहता प्रयोगशील बनावे, समाजातील समस्या ओळखून त्यावर वैज्ञानिक उपाय शोधावेत, असे आवाहन त्यांनी केले. शिक्षण संस्थांनी अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवनवीन संधी उपलब्ध करून द्याव्यात, असेही त्यांनी नमूद केले.

प्रमुख अतिथी म्हणून बोलताना सौ. शाहीनताई हकीम (अध्यक्षा, दृष्टी फाउंडेशन) यांनी विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रकल्पांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता व नवकल्पना या समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या आहेत. विज्ञानाचा उपयोग मानवी जीवन अधिक सुलभ, सुरक्षित व समृद्ध करण्यासाठी व्हावा, असे त्यांनी सांगितले. मुलींच्या शिक्षणात विज्ञानाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून अधिकाधिक मुलींनी विज्ञान क्षेत्रात करिअर घडवावे, असे प्रेरणादायी मनोगत त्यांनी व्यक्त केले.

उद्घाटनप्रसंगी तनुश्रीताई आत्राम यांनी विज्ञान प्रदर्शनीमुळे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, चिकित्सक विचारसरणी व आत्मनिर्भरतेची भावना निर्माण होते, असे सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य शाहीद शेख यांनी केले. त्यांनी तालुका विज्ञान प्रदर्शनीच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नाविन्यपूर्ण प्रकल्पांची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. पिंपळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सुनतकर यांनी मानले.

या तालुका विज्ञान प्रदर्शनीत तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण, आरोग्य, शेती, ऊर्जा संवर्धन, आधुनिक तंत्रज्ञान आदी विषयांवरील उपयुक्त व समाजाभिमुख विज्ञान प्रकल्प सादर केले. मान्यवरांनी प्रत्येक प्रकल्पास भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले व मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच तालुक्यातील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुका विज्ञान प्रदर्शनीमुळे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक विचारांना नवी दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.