- देसाईगंज: 26ऑक्टोबर
आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या ‘जनकल्याण यात्रे’ला देसाईगंज येथे नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. या जाहीर सभेला नागरिकांचा जनसागर उसळला होता. देसाईगंजच्या इतिहासातील ही सर्वात मोठी सभा ठरल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.
‘अविस्’ व काँग्रेस ला मोठे खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश
याच भव्य सभेत आदिवासी विद्यार्थी संघाचे (अविस) सरसेनापती व माजी जिल्हा परिषद सदस्य नंदू नरोटे, सिरोंचा येथील काँग्रेस नेते बानय्या जंगम आणि ज्येष्ठ नेते मोहन पुराम यांच्यासह विविध पक्षांतील शेकडो नेते व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे आदिवासी विद्यार्थी संघाला मोठे खिंडार पडले आहे.
प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे आश्वासन
उपस्थितांना संबोधित करताना आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी ‘लाडकी बहीण’ सारख्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली. ते म्हणाले की, देसाईगंज शहरात प्रॉपर्टी कार्डचे अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत, तसेच पेसाचा प्रश्नही आहे. या भागातील अनेक नेत्यांना हे प्रश्न ५० वर्षांच्या काळात सोडवता आले नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्हाला संधी दिल्यास हे सर्व प्रलंबित प्रश्न सोडविणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
तालुका निर्मिती व नाट्यगृहाचा उल्लेख
आत्राम यांनी १९९१ साली पहिल्यांदा निवडून आल्यानंतर देसाईगंज तालुक्याच्या निर्मितीसाठी केलेल्या प्रयत्नांची आठवण करून दिली. तसेच, शहरात भव्य नाट्यगृह मंजूर केल्यामुळे झाडीपट्टी रंगाभूमीला हक्काचे व्यासपीठ मिळाल्याचे सांगितले. आगामी निवडणुकीत सत्ता दिल्यास याहून अधिक विकास कामे करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी, सिने अभिनेत्री माधुरी पवार, युवा नेते हर्षवर्धनबाबा आत्राम यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, नेते व नागरिक उपस्थित होते.




