मिलिंद खोंड:
गडचिरोली:26ऑक्टोबर
सिरोंचा भागात बांनय्या जंगम यांचा चांगलाच जनाधार आहे सोबतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वर त्यांच्या प्रवेशाचा परिणाम होऊ शकतो सिरोंचा पट्ट्या मध्ये काँग्रेस ला याचा फटका बसू शकतो सोबतच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार अहेरी क्षेत्रासोबतच सिरोंचा क्षेत्रातून जीप लढण्याची शक्यता असल्याच्या चर्चा होत्या मात्र आज त्यांच्या खंद्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाने येथून त्यांच्या लढण्याची मार्ग आता” काटेरी”झाला आहे.
काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाकडून सातत्याने अपेक्षाभंग झाल्यामुळे आणि सिरोंचा तालुक्याकडे दुर्लक्ष केल्याच्या नाराजीतून, काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते बानय्या जंगम यांनी आपल्या अनेक समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेस श्रेष्ठींनी तालुक्याला प्रतिनिधित्व न देणे आणि कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्यामुळे नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस (अ. प )मध्ये नव प्रवेशित बानय्या जंगम यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी बोलताना जंगम यांनी काँग्रेसमधील आपल्या प्रवासावर नाराजी व्यक्त केली. दोन वर्षांपूर्वी त्यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्यासोबत आविस (अहेरी विधानसभा क्षेत्र)ची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, प्रवेशानंतर काँग्रेसच्या जिल्हा स्तरावरील वरिष्ठ नेत्यांकडून सिरोंचा तालुक्यातील त्यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांची सातत्याने अवहेलना करण्यात आली.
जंगम यांनी सांगितले की, “काँग्रेस पक्ष नेतृत्वाने जेव्हापासून माझा प्रवेश झाला तेव्हापासून सिरोंचा तालुक्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. काँग्रेस श्रेष्ठींनी सिरोंचा तालुक्याला कोणतेही प्रतिनिधित्व दिले नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिले. त्यामुळे खासदारांचेही आमच्या भागाकडे लक्ष नव्हते आणि नाईलाजाने अजय कंकडालवार यांचीही साथ सोडावी लागली.”
जिल्हाध्यक्षांकडून वेळकाढूपणा
काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी तीव्र असंतोष व्यक्त केला. सिरोंचा तालुका कार्यकारिणी बनवण्यासंदर्भात वारंवार विचारणा केली असता, जिल्हाध्यक्षांनी “पुन्हा अवधी आहे” असे सांगून नेहमीच वेळ काढूपणा केला आणि विषय टाळला. जंगम यांनी खंत व्यक्त केली की, “एका प्रकारे आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले कार्यकर्ते बाजूला फेकलेल्यांपैकीच होतो. आमची गत तशीच झाली होती.”
काँग्रेस नेतृत्वाकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने आणि तालुक्याच्या विकासाचे प्रश्न दुर्लक्षित राहिल्याने अखेरीस त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सिरोंचा तालुक्याच्या विकासासाठी सक्रिय योगदान देण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांच्या या ‘राष्ट्रवादी’तील प्रवेशामुळे सिरोंचा तालुक्याच्या राजकीय गणितात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजकीय उलथापालथ: अजय कंकडालवार यांच्यासमोर मोठा पेच
गडचिरोली जिल्हा परिषदेत सलग अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद भूषवलेले आणि अहेरीच्या राजकारणातील महत्त्वाचे नाव असलेले अजय कंकडालवार यांच्या राजकीय भविष्यावर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काँग्रेस पक्षात अपेक्षित स्थान आणि पाठबळ मिळत नसल्याने, त्यांच्यासमोर मोठा पेचप्रसंग उभा राहिला असून, ते लवकरच पक्षांतर करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
काँग्रेसमध्ये ‘कोंडी’ आणि नाराजी
जिल्हा परिषदेतील यशस्वी कारकिर्दीनंतर अजय कंकडालवार यांनी दोन वर्षांपूर्वी एक मोठा राजकीय निर्णय घेतला होता. आपले राजकीय गॉडफादर मानले जाणारे माजी आमदार दीपक आत्राम यांची साथ सोडून, त्यांनी तत्कालीन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासोबत काँग्रेसचा हात पकडला. मात्र, काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची राजकीय वाटचाल सुकर झाली नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस पक्षात त्यांचे योग्य मूल्यांकन झाले नाही आणि एका प्रकारे त्यांची राजकीय कोंडी होत होती. पक्षाच्या जिल्हास्तरीय नेतृत्वाकडून त्यांना अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याची आणि स्थानिक राजकारणात त्यांना डावलले जात असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. नुकतेच बानाया जंगम यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतानाही, कंकडालवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये गेलेल्या कार्यकर्त्यांची अवहेलना झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता, ज्यामुळे कंकडालवार यांच्या नाराजीला बळ मिळाले.
‘राष्ट्रवादी’ प्रवेशाच्या चर्चा आणि गुप्त बैठका
काँग्रेसमधील या कोंडीमुळे कंकडालवार यांनी पर्यायी राजकीय वाटा शोधण्यास सुरुवात केली आहे. मध्यंतरी, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) प्रवेश करण्याच्या जोरदार चर्चा रंगू लागल्या होत्या. एवढेच नव्हे, तर त्यांच्या ‘राष्ट्रवादी’तील संभाव्य प्रवेशासंदर्भात काही गुप्त बैठका देखील झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
माजी आमदार दीपक आत्राम यांची साथ सोडल्यानंतर त्यांना काँग्रेसमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही. त्यातच, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सध्या भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीसोबत सत्तेत आहे. त्यामुळे, सत्तेत सहभागी असलेल्या पक्षात प्रवेश करून आपल्या राजकीय कारकिर्दीला नवी दिशा देण्याचा विचार कंकडालवार करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अहेरी आणि गडचिरोली जिल्हा परिषदेच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या कंकडालवार यांच्या पुढील भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. त्यांचा हा संभाव्य निर्णय अहेरीच्या स्थानिक राजकारणात आणि आगामी जिल्हा परिषद तसेच विधानसभा निवडणुकांमध्ये मोठी उलथापालथ घडवणारा ठरू शकतो.




