गडचिरोली:10ऑक्टोबर
महायुतीमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीत स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या तोंडावर जुंपली आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रातील विकासकामांमध्ये सहपालकमंत्री आशीष जयस्वाल यांच्या वाढलेल्या हस्तक्षेपावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार व माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आमदार आत्राम यांनी जयस्वाल यांच्यावर केवळ विकासकामांमध्येच नव्हे, तर अधिकाऱ्यांवरही दबाव टाकत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. विकासकामातील निधी आणि अधिकार यावरून शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात हा संघर्ष विकोपाला गेला असून, या अंतर्गत वादाची ‘वादळी ठिणगी’ महायुतीच्या समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आपल्याकडे राखून ठेवले असतानाही, गडचिरोली जिल्ह्यातील विकासकामांना खीळ बसली असून, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी सर्वसामान्य नागरिकांची कामे जुमानत नाहीत, असा गंभीर आरोप विरोधकांनी अनेकदा केला आहे.
विकासकामांच्या या दुरवस्थेमुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे खोळंबली असून, या विरोधात काँग्रेस पक्षाने अनेकदा आंदोलने केली आहेत.
विशेष म्हणजे, हा असंतोष केवळ विरोधकांपुरता मर्यादित नाही. महायुतीमधीलच प्रमुख नेते, जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या विकासकामातील वाढत्या हस्तक्षेपावरून महायुतीतील नेत्यांनी विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी आता नाराजी व्यक्त केली आहे. या अंतर्गत संघर्षामुळे विकासकामे ठप्प असल्याची चर्चा आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीत ‘आलबेल’ नाही:
जिल्हाचे पालकमंत्री राज्याचे मुख्यमंत्री असतानाही प्रशासनाचे नियंत्रण सुटले आहे आणि महायुतीतीलच घटकपक्ष आपसात लढत आहेत. या परिस्थितीमुळे महायुतीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर ‘आलबेल’ नसल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.
पालकमंत्री फडणवीस यांनी जिल्ह्याच्या प्रशासकीय आणि विकासकामांच्या स्थितीवर लक्ष घालून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी जोर धरत आहे.




