अहेरी:
भामरागड आणि ताडगावला जोडणाऱ्या पर्लकोटा नदीवरील पुलावर पेरलेल्या भुसुरूगांचा स्फोट केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. तर दुसरे स्फोटक नष्ट करण्यात पोलिसांना यश आले आहे.
सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी विधानसभा निवडणुकीच्या आधी घातपात करण्याचा मोठा डाव उधळून लावला आहे.विशेष म्हणजे,उद्या 17 नोव्हेंबर ला गृहमंत्री अमित शहा गडचिरोली मध्ये प्रचारासाठी येत आहेत त्यामुळे या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांचा मोठा घातपात करण्याची योजना असण्याची शक्यता आहे.
त्यामुळे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
आलापल्ली- भामरागड राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. भामरागडजवळील पर्लकोटा नदीवरी नवीन पूल बनत आहे. त्यासाठी तेथे काही मजूर काम करतात. त्यांना वायर सारखे काही दिसले याची सूचना त्यांनी पोलीसांना दिली . दरम्यान पोलिसांनी तपासणी केली असता स्फोटाच्या ठिकाणी चुन्याने ओढलेल्या रेषा दिसून आल्या. या परिसरात सध्या पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. नक्षली अनेकदा जमिनीत स्फोटके पेरुन ठेवतात, त्यानंतर स्फोट घडवून आणतात. या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारचा धोका नको म्हणून पोलिसांनी परिसर पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. बॉम्ब शोधक व नाशक पथकामार्फत तपासणी केली जात असून या मार्गावर मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. आलापल्ली-भामरागड मार्गावरील वाहतूक देखील रोखून धरली आहे.




