गडचिरोली:
एकीकडे जिल्ह्यात जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह आणि विविध कार्यक्रमांची धूम सुरू असतानाच, धानोरा तालुक्यातील जपतलाई येथे एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. कुप्पा लिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संचलित अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात रविवारी मध्यरात्री विषारी सापाने दंश केल्याने ३ निष्पाप विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर ३ मुलींची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जमिनीवर झोपल्या अन् काळाने टाकला दरोडा मिळालेल्या माहितीनुसार, वसतिगृहात क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी आणि खाटांची (कॉट्स) पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थिनींना जमिनीवरच गाद्या अंथरून झोपावे लागत होते. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास सर्व मुली गाढ झोपेत असताना विषारी सापाने जमिनीवर झोपलेल्या ६ मुलींना दंश केला. मुलींच्या किंचाळण्याने वसतिगृहात प्रचंड गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारापूर्वी व उपचारादरम्यान तीन विद्यार्थिनींची प्राणज्योत मालवली.
मृत व गंभीर विद्यार्थिनींची नावे:
मृत विद्यार्थिनी: १. सुश्मिता सरोजित मंडल (वय १४ वर्ष) २. दीपिका एतवा लकडा (वय १२ वर्ष) ३. अनु गजुराम कोरेटी (वय ८ वर्ष)
गंभीर जखमी (उपचार सुरू असलेल्या विद्यार्थिनी): १. दीपिका बिटलूरसाय मडावी (वय ११ वर्ष) २. समृद्धी सुरेश नैताम (वय १४ वर्ष) ३. कविता राजकुमार किरंगा (वय १२ वर्ष)
अधीक्षिका गायब; प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप ही घटना घडली त्या मध्यरात्री वसतिगृहाच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या महिला अधीक्षिका (वॉर्डन) कर्तव्यावर उपस्थित नव्हत्या, अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे. जबाबदार अधिकारी हजर नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत मुलींना तातडीने वैद्यकीय मदत मिळण्यात अडचणी आल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
आश्रमशाळांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर या भीषण घटनेमुळे दुर्गम भागातील आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृहांमधील सुविधांचा बोजवारा उडाला असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
विद्यार्थिनींना जमिनीवर का झोपावे लागत होते?
परिसरात स्वच्छता आणि सर्पप्रतिबंधक उपाययोजना का केल्या गेल्या नव्हत्या?
मध्यरात्री जबाबदार अधीक्षिका गैरहजर कशी काय राहू शकते?
असे अनेक गंभीर प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची तसेच मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत देण्याची जोरदार मागणी स्थानिक नागरिक आणि आदिवासी संघटनांकडून केली जात आहे.




