दुरवस्थेतील पुलामुळे मरपल्ली ग्रामस्थ त्रस्त; खनिकर्म निधी कुठे गेला? नाल्यात उतरून आंदोलन; १० दिवसांत काम मंजूर न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

0
5

एटापल्ली : तालुक्यातील मरपल्ली येथील पुलाची अत्यंत दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुलाची तातडीने दुरुस्ती किंवा नवीन पूल बांधण्यात यावा, या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी नाल्यात उतरून शासनाच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

एटापल्ली तालुका परिसरात मोठ्या प्रमाणात खनिकर्म सुरू असून, मरपल्ली पासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर खाणकाम सुरू असतानाही तालुक्यातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. खनिकर्मातून मिळणारा निधी नेमका कुठे जात आहे?, असा प्रश्नही आंदोलनकर्त्यांनी केला.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पुलाच्या दुरुस्तीबाबत यापूर्वी तीन ते चार वेळा जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. मात्र अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. या पुलावरून ये-जा करताना आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून, भविष्यात आणखी जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

पुलाची दुरवस्था लक्षात घेता शासनाने तातडीने काम मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी. येत्या १० दिवसांत पुलाच्या कामाला मंजुरी न मिळाल्यास नाल्याच्या पाण्यात उतरून आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा मरपल्ली ग्रामस्थांनी दिला आहे.

या आंदोलनावेळी तालुका काँग्रेसचे प्रमुख नेते तथा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि गानली समाज संघटनेचे अध्यक्ष प्रज्वल नागूलवार यांच्यासह भूमिया फकरी रापंजी, बम्मा रापंजी, किशोर मझझी, शिवाजी लेकामी, मधुकर रापंजी, सत्तू पुंगाटी, मनीष हेडो, करण हेडो, करण हलामी, मोतीराम गावडे, मधुकर मितलामी, निलेश लेकामी, रमेश बावणे, सुधाकर रापंजी, लालूजी लेकामी, गणेश कुळयेटी, अभिजित सिडाम, वाडुजी लेकामी, नरेश लेकामी, विलास हिचामी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

पुलाच्या प्रश्नावर प्रशासन आता तरी गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करणार का, याकडे मरपल्ली ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.