अहेरीत ‘विराट हिंदू संमेलन’ उत्साहात; राष्ट्रसेवेसाठी महिलांनी व पुरुषांनी पुढे येण्याचे अंजलीताई हिरुरकर यांचे आवाहन

0
5

अहेरी:10 मार्च

अहेरी येथील वीर ब्राम्हमगारु मंदिर पटांगणात ‘विराट हिंदू संमेलनाचे’ भव्य आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलांनी केवळ घरगुती जबाबदाऱ्यांपुरते मर्यादित न राहता राष्ट्र उभारणीत आपला सहभाग नोंदवावा, असे प्रेरणादायी आवाहन प्रमुख वक्त्या अंजलीताई हिरुळकर यांनी केले. राणी दर्याबाई वस्तीच्या वतीने आयोजित या संमेलनात अहेरी नगरातील विविध वॉर्डांमधून हजारो महिला व पुरुषांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पंचपरिवर्तनाचा मंत्र राष्ट्र सेविका समितीचे सहकार्यवाहिका,चंद्रपूर येथील मुख्य वक्त्या अंजलीताई हिरुळकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ‘पंचपरिवर्तन’ संकल्पना मांडली. त्या म्हणाल्या की, प्रत्येक नागरिकाने आपल्या दैनंदिन जीवनात खालील पाच तत्त्वांचा अवलंब करावा: • सामाजिक समरसता: समाजात एकता निर्माण करणे. • कुटुंब प्रबोधन: कुटुंबात संस्कारांची जोपासना करणे. • पर्यावरण: निसर्गाचे रक्षण करणे. • स्व-आधारित जीवन: स्वावलंबी बनणे. • नागरी कर्तव्ये: आपल्या कर्तव्यांचे पालन करणे. “आजची महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात कार्य करत आहे. महिलांनी ‘चूल आणि मूल’ या मर्यादेतून बाहेर पडून राष्ट्रसेवेसाठी आपला अमूल्य वेळ द्यावा.” – अंजलीताई हिरुळकर

(कार्यक्रमाची वैशिष्ट्ये) प्रारंभ भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सांस्कृतिक मेजवानीत गुरु भालचंद्र ठाकरे यांच्या प्रशिक्षणार्थींनी सादर केलेल्या ‘भरतनाट्यम्’ नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. सन्मान स्त्री शक्तीचा म्हणत महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या महिला व पुरुषांना बक्षिसे देऊन प्रोत्साहित करण्यात आले. तसेच वेळेत आलेल्या महिलांना करिता पाच भाग्यवान महिला निवड करण्यात आले त्यांना आकर्षक बहुमान देण्यात आले. मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून संत राजेंद्रजी दोन्तुल महाराज, कार्यक्रमाचे संयोजक विलास कंदोटीवार आणि स्थानिक वस्तीतील प्रमुख नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुबक संचालन पूर्वा दोन्तुलवार यांनी केले, प्रास्ताविक भाविका मेहता,प्रश्न मंजुषा कांचन देशपांडे तर वैशाली देशपांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता ‘भारत मातेच्या आरतीने’ झाली, ज्यानंतर सर्व उपस्थित जनसमुदायासाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनामुळे संपूर्ण अहेरी परिसरात भक्तीमय आणि राष्ट्रप्रेमाचे वातावरण निर्माण झाले होते.