गडचिरोली:
सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीचे रुपांतर समलैंगिक संबंधात झाले, पण याच संबंधांचा शेवट अत्यंत धक्कादायक आणि रक्तरंजित घटनेने झाला आहे. समलैंगिक विवाहाचा नकार दिल्यामुळे एका युवकाने आपल्याच पार्टनरची चाकूने भोसकून हत्या केल्याची थरारक घटना एटापल्ली तालुक्यातील देवदा गावाजवळ घडली आहे.सतीशकुमार जगदिशप्रसाद निसाद (वय ३२ वर्षे, रा. नागेपल्ली, ता. अहेरी) असे मृत युवकाचे नाव असून, पोलिसांनी आरोपी सुरज हलदार (वय ३० वर्षे, रा. मिरगन, जि. नबरंगपूर, ओडिशा) याला बेड्या ठोकल्या आहेत.
फेसबुकवर मैत्री आणि नंतर समलैंगिक संबंध
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत सतीशकुमार हा नागेपल्ली येथे डिझेल वॉश पंप Wगॅरेजचा व्यवसाय करायचा. त्याची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओडिशा येथील सुरज हलदार याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर आधी मैत्रीत आणि नंतर घट्ट समलैंगिक संबंधांमध्ये झाले. दोन दिवसांपूर्वी सुरज हा सतीशकुमारला भेटण्यासाठी थेट ओडिशावरून नागेपल्ली येथे आला होता.
‘तो’ नकार ठरला मृत्यूचे कारण
सुरजची इच्छा होती की सतीशकुमारने त्याच्यासोबत विवाह करावा. यासाठी त्याने सतीशकुमारकडे वारंवार हट्ट धरला. मात्र, सतीशकुमारने आपण आधीच विवाहित असल्याचे सांगत सुरजसोबत लग्न करण्यास साफ नकार दिला. या नकारामुळे सुरज प्रचंड अस्वस्थ झाला होता आणि त्याच्या मनात रागाची ठिणगी पडली.
चालत्या वाहनात वाद अन थेट चाकूने वार
रविवारी सकाळी सुरज आपल्या गावी परतण्यासाठी निघाला. सतीशकुमार त्याला सोडण्यासाठी आपल्या चारचाकी वाहनाने निघाला होता. गाडी छत्तीसगड सीमेजवळील देवदा गावाजवळ पोहोचली असता, दोघांमध्ये लग्नाच्या कारणावरून पुन्हा कडाक्याचे भांडण झाले. या वादात रागाच्या भरात सुरजने आपल्याजवळ असलेला चाकू काढला आणि सतीशकुमारवर सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सतीशकुमारचा जागेवरच मृत्यू झाला.
नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपी जेरबंद
घटनेनंतर गाडीत आरडाओरड झाल्याने स्थानिक नागरिक तात्काळ मदतीसाठी धावले. सतीशकुमार रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून नागरिकांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपी सुरज हलदार याला जागेवरच पकडून ठेवले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. या धक्कादायक प्रकरणाचा पुढील तपास हालेवारा पोलीस करत आहेत.




