गडचिरोली | प्रतिनिधी:
गडचिरोली आणि छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात गेल्या दोन दिवसांपासून पोलीस आणि माओवाद्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. या मोहिमेत आतापर्यंत एका पुरुष माओवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आले असून, माओवाद्यांच्या गोळीबारात सी-६० पथकाचा एक जवान जखमी झाला आहे.
नेमकी घटना काय?
३ फेब्रुवारी रोजी मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार, भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वात सी-६० च्या १४ पथकांनी मौजा फोदेवाडा जवळील घनदाट जंगलात शोधमोहीम हाती घेतली. कंपनी क्रमांक १० चे सदस्य आणि छत्तीसगडमधील अज्ञात दलमचे माओवादी या परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.मोहिमेतील आतापर्यंतचे मोठे अपडेट्स:
दोन तळ उद्ध्वस्त: काल झालेल्या चकमकीत पोलिसांनी माओवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त केले असून मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य जप्त केले आहे.
एक माओवादी ठार: आज सकाळी अतिरिक्त कुमक (४ सी-६० पथके आणि १ सीआरपीएफ क्यूएटी पथक) पाठवल्यानंतर झालेल्या चकमकीत एका पुरुष माओवाद्याचा मृतदेह सापडला आहे.
शस्त्रसाठा जप्त: घटनास्थळावरून एक एके-४७ आणि एक एसएलआर (SLR) रायफल जप्त करण्यात आली आहे.
जवान जखमी: आज संध्याकाळी माओवाद्यांनी केलेल्या जोरदार गोळीबारात सी-६० पथकाचा एक जवान जखमी झाला. त्याला तातडीने पुढील उपचारासाठी जंगलाबाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.सर्च ऑपरेशन सुरूचहा भाग अत्यंत घनदाट जंगल आणि कठीण भूभागाचा असल्याने शोधमोहिमेत आव्हाने येत आहेत. चकमकीत आणखी काही माओवादी जखमी किंवा ठार झाल्याची शक्यता पोलीस दलाने वर्तवली आहे. सध्या संपूर्ण परिसरात शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून, कारवाई पूर्ण झाल्यानंतर गडचिरोली पोलीस दलातर्फे सविस्तर माहिती दिली जाणार आहे.




