मी आणि माझ्या झाडीपट्टीची दंडार•••..

0
195

मी आणि माझ्या झाडीपट्टीची दंडार•••

रात्री सहज यूट्यूब वरून बोटं सरकवतांना एका व्हिडिओवर माझी नजर रोखली. व्हिडिओचे टायटल होते, ‘झाडीपट्टी चेक बेरडी दंडार.’ क्षणात मागील ४४ वर्षापूर्वीचा घटनाक्रम माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेला. माझे वय त्यावेळेस जेमतेम ७ – ८ वर्षाचे असेल. तेंव्हा आम्ही गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात असलेल्या महागांव येथे राहायचो. दिवस कोणता आठवत नाही पण त्या रात्री आमच्या गावात दंडारीचा प्रयोग होता. रात्रीचे कदाचित ८ वाजले असणार. मी त्यावेळेस रॉकेलच्या दिव्याच्या मिणमिणत्या प्रकाशात माझा स्वाधाय सोडवत होतो. अचानक तीन चार माणसे आमच्या घरी धावत आलीत आणि माझ्या बाबांना विनंती करू लागलीत की, ‘तुमच्या लक्ष्मणला आमच्या दंडारीच्या कार्यक्रमात पाठवा, कारण आमच्यातला टाळ वाजवणारा गडी आजारी पडला. तुमच्या लक्ष्मणला रात्रभर दंडारीत टाळ वाजवायचे आहे. त्याला पाठवता का?’ माझ्या बाबांनी मला टाळ वाजवायला जाण्याची परवानगी दिली. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. कारण मला बाबांची भिती नव्हती, भीती होती माझ्या थोरल्या भावाची – राजारामची, जो हल्ली केंद्रप्रमुख या पदावर कार्यरत आहे. मग काय? मी त्या दंडारीच्या दिशेने अशी काय धूम ठोकली की धावतांना माझे पाय जमिनीला टेकत नव्हते. कारण, दंडार म्हणजे माझा जीव की प्राण! मला संगीतातील ताला सुराची बालपणापासूनच जाण आहे.

आता थोडंसं दंडार या विषयावर बोलू या….

. ही कला केवळ मनोरंजनाचे साधन नव्हते, तर ते जनजागृतीचे एक प्रभावी माध्यम होते. काही दशकांपूर्वी, जेव्हा माध्यमांची एवढी विविधता आणि उपलब्धता नव्हती, तेव्हा ग्रामीण भागातील जनतेपर्यंत सामाजिक संदेश पोहोचवण्याचे काम दंडारसारख्या लोककला प्रकारांनी मोठ्या खुबीने केले. सामाजिक विषयांवर आधारित संगीतमय प्रयोग, संवाद आणि हलक्याफुलक्या नाट्यछटांमधून ही कला लोकांच्या मनाला भिडायची. हुंडा बळी, स्त्री-पुरुष समता, व्यसनमुक्ती, शिक्षणाचे महत्त्व, यांसारखे अनेक गंभीर विषय गावागावात सहजपणे पोहचवण्याचे सामर्थ्य दंडारमध्ये होते.
मी स्वतः या कलेचा एक उपासक होतो आणि आहो. एरव्ही मी अनेक दंडारींमध्ये भूमिका सुद्धा वठविल्या आहेत. खास करून सन २००३ मध्ये येरमणार (पेरमिली) येथे दंडारीमध्ये मी वठविलेली ‘अरुण’ नावाची भूमिका माझ्यासाठी अविस्मरणीय राहील. केवळ रसिक म्हणून नाही, तर एक कार्यकर्ता म्हणूनही या कलेत मी आपले योगदान दिले आहे. गावातल्या सार्वजनिक सण-उत्सवांमध्ये मी दंडारचे बरेच प्रयोग सादर केले आहे. त्या काळातील माझे अनुभव आजही माझ्या स्मरणात कोरले गेले आहेत. सजवलेल्या व्यासपीठावर उभं राहून, ढोलकी आणि टाळच्या तालावर संवाद आणि गाणे म्हणतांना आणि श्रोत्यांच्या टाळ्यांनी साद दिली जाताना जे समाधान मिळायचं, ते शब्दांत मांडता येणं शक्यच नाही.

दंडार म्हणजे खेड्या-पाड्यातील एक समृद्ध, परंपरागत लोककला! दंडार ही केवळ कला नाही, ती ग्रामीण संस्कृतीची एक श्वासमय अभिव्यक्ती होती. जेंव्हा टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाईल असला काही थाटबाट नव्हता तेंव्हा मनोरंजनाचे एकमेव साधन म्हणून दंडारीकडे लोक बघायचे. दुर्दैवाने म्हणावे लागेल की आता हळूहळू या समृद्ध लोककलेचा अस्त होतांना दिसत आहे. कधीकाळी गावोगावी जिच्या गजराने नांदणाऱ्या मातीला सांस्कृतिक ओलावा दिला, तीच दंडार आज केवळ आठवणीत उरते आहे. नव्या पिढीला तिचा गंधसुद्धा कळत नाही. मोबाईल, टीव्ही आणि इंटरनेटच्या झगमगाटात या परंपरेचा प्रकाश हळूहळू मावळताना दिसतो आहे. ज्यांनी या कलेत जीव ओतला, त्यांनीही आता नाईलाजाने गप्प बसावं, इतकी उदासीनता पसरली आहे. व्यासपीठ ओस पडलीत, ढोलकीचे ठोके थांबलेत, आणि प्रेक्षकांची गर्दी आता इतिहासजमा झाली आहे.
ज्यांनी समाजासाठी, संस्कृतीसाठी, जाणीवेने ही कला उभी केली, त्यांच्या आठवणी मनात कालवाकालव करतात. दंडार आता केवळ आठवणीत उरली आहे, जपली गेली तरच ती पुन्हा उभारी घेईल. नाहीतर ही अमोल परंपरा केवळ पुस्तकांत आणि वृद्धांच्या आठवणीतच शिल्लक राहील. आपणच जर पुढे येऊन ती वाचवली नाही, तर आपल्या संस्कृतीचा एक जिवंत भाग कायमचा हरवून जाईल.
अशा या महान लोककलेचा भाग होणं, हे माझ्या आयुष्यातील मी माझ्या कर्मभूमीचे एक प्रतिबिंब समजतो.

✍️ लक्ष्मण रत्नम (शिक्षक)

मोब. न. 8275626303