आलापल्ली:- आलापल्ली येथील राजे विश्वेश्वरराव आत्राम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आलापल्ली व वीर शहीद केसरीचंद शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिमलगट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या वर्कशॉप हॉल मध्ये ‘एकात्म मानव दर्शन हीरक महोत्सव’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात सरस्वती माता व पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
सर्वप्रथम पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या ‘एकात्म मानव दर्शन’ या तत्त्वज्ञानावर सखोल चर्चा करण्यात आली. मानवी जीवनातील भारतीय संस्कृती आणि मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या मंचावर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. रवींद्र हजारे आणि पंकज नौनुरवार यांनी आपले विचार मांडले. त्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याला आदराने स्मरण करत त्यांच्या विचारांचा वर्तमान काळात किती उपयोग होऊ शकतो, आणि आज का गरज आहे. राष्ट्र पुनर्निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे मार्ग असल्याचे सांगितले. अलीकडच्या इंटरनेट काळात तरुण पिढीला देश प्रेमाची भावना निर्माण करण्याची गरज भासू लागली आहे. पुरुषार्थ ठिकवणे तेवढेच महत्त्वाचे अशा विविध विषयावर मार्गदर्शन केले.
तसेच या मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना एकात्मतेची भावना आणि सामाजिक समरसतेचे महत्त्व पटवून दिले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एम. बी. लोणे होते. तसेच, प्रमुख पाहुणे म्हणून व्यवस्थापन समितीचे सदस्य विजय चव्हाण आणि एस. एम. भंडारकर उपस्थित होते.
या कार्यक्रमात संस्थेतील शिक्षक, कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आयोजनामुळे विद्यार्थ्यांना भारतीय मूल्यांची ओळख झाली आणि त्यांना एक चांगला संदेश मिळाला.
कार्यक्रमाचे संचलन कु.बी.एस. येरावार ,प्रास्ताविक अस्मित वासेकर , तर आभार युराज अमरपुरीवार यांनी मानले.




