गडचिरोली पोलिसांनी हैदराबादमधून एका सक्रिय माओवाद्यास केली अटक..विविध गुन्हात होता सहभाग.

0
8

गडचिरोली: 7सप्टेंबर

गडचिरोली पोलिसांनी हैदराबादमधून (तेलंगणा) येथून एका सक्रिय   माओवाद्यास अटक केली आहे. शंकर उर्फ अरुण येर्रा मिच्चा (वय २५, रा. बांदेपारा, जि. बीजापूर, छत्तीसगड) असे अटक केलेल्या माओवाद्याचे नाव आहे. त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
ही कारवाई ४ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आली. ही अटक गडचिरोली पोलीस दलासाठी एक मोठे यश मानले जात आहे.

गडचिरोली पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बोरसे आणि सी-६० पथकाने ही कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी हैदराबाद येथे लपून बसलेल्या शंकर उर्फ अरुण येर्रा मिच्चाला ताब्यात घेतले.
तपासादरम्यान, नोव्हेंबर २०२३ मध्ये  कापेवंचा येथे रामजी चिन्ना आत्राम या निरपराध व्यक्तीच्या हत्येमध्ये त्याचा थेट सहभाग असल्याचे उघड झाले. याप्रकरणी अहेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
त्याचा २०२० मध्ये येडदर्मी जंगल परिसरात पोलिसांसोबत चकमक,२०२१ मध्ये मडवेली जंगल परिसरात पोलिसांसोबत चकमक २०२३मध्ये वेडमपल्ली जंगल परिसरात पोलिसांसोबत चकमक. व २०२४ मध्ये चितवेली जंगल परिसरात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत सहभाग होता.

शंकरचा माओवादी चळवळीतील सहभाग
शंकर उर्फ अरुण येर्रा मिच्चा सप्टेंबर २०१८ मध्ये छत्तीसगडमधील मद्देड दलममध्ये भरती झाला होता. त्यानंतर तो डिसेंबर २०१८ मध्ये गडचिरोली डिव्हिजनमध्ये आला.
डिसेंबर २०१८ ते २०२२: डिव्हीसीएम शंकरअण्णा उर्फ असाम उर्फ शिवा उर्फ शिवय्या यांचा अंगरक्षक म्हणून काम,२०२२ ते २०२४: पेरमिली दलममध्ये सदस्य म्हणून कार्यरत.

पोलिसांच्या तीव्र कारवाईमुळे आणि पेरमिली दलम निष्क्रिय झाल्याने शंकरने २०२४ मध्ये दलम सोडले. त्यानंतर तो ७-८ महिने शेतीची कामे करत होता. नंतर तो आंध्रप्रदेशातील एंटापूर आणि त्यानंतर हैदराबाद येथे कामासाठी गेला.
माओवाद्यांवरील कारवाई
गडचिरोली पोलीस दलाने जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत १०८ माओवाद्यांना अटक केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातून माओवाद संपवण्यासाठी पोलीस दल सातत्याने प्रयत्न करत आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी माओवाद्यांना हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करण्याचे आणि सन्मानाचे जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.