नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने पुन्हा मारली बाजी: अभिजीत वंजारी विजयी; कराडे गुरुजी ठरले गेमचेंजर!

0
2

 

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने पुन्हा मारली बाजी: अभिजीत वंजारी विजयी; कराडे गुरुजी ठरले गेमचेंजर!

नागपूर, दि. २९: नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत इंडियन नॅशनल काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी विजय मिळवत आपली जागा कायम राखली आहे. या संपूर्ण राजकीय घडामोडीत कराडे गुरुजी यांची भूमिका निर्णायक ठरल्याने ते या निवडणुकीचे ‘गेमचेंजर’ ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

नागपूरच्या मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता ८४ टेबलवरून मतमोजणीला सुरुवात झाली. तब्बल ४१ तासांपेक्षा जास्त वेळ चाललेल्या या मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी अभिजीत वंजारी यांना विजयाचे प्रमाणपत्र प्रदान केले.

मतमोजणीची आकडेवारी: पहिल्या पसंतीच्या दोन फेऱ्यांमध्ये कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक ७५ हजार ४३८ मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही. पहिल्या पसंतीच्या १ लाख ६५ हजार ९०६ मतांपैकी १५ हजार ३२ मते अवैध ठरली, तर १ लाख ५० हजार ८७४ मते वैध ठरली. त्यानंतर द्वितीय पसंतीक्रमाची बाद फेरी घेण्यात आली, परंतु त्यातही कुठल्याही उमेदवाराला निर्धारित कोटा गाठता आला नाही.

अखेर, पहिल्या व द्वितीय पसंतीक्रमाच्या बाद फेरी मिळून सर्वाधिक ६७ हजार २३१ मते मिळवणारे अभिजीत वंजारी यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यांचे नजिकचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पार्टीचे सुधाकर कोहळे यांना ६३ हजार ९६० मते मिळाली.

या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान निवडणूक निरीक्षक डॉ. हर्षदीप कांबळे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, तसेच विभागातील सर्व जिल्ह्यांचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हाधिकारी आणि वॉर्डाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

भारत निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार २३ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडले होते आणि ४१ तासांच्या मॅरेथॉन मतमोजणीनंतर अखेर काँग्रेसने या मतदारसंघावर पुन्हा एकदा आपला झेंडा रोवला आहे.