अहेरी – 7सप्टेंबर
अहेरी येथील आझाद गणेश मंडळाच्या वतीने शनिवार, दिनांक ६ सप्टेंबर २०२५ रोजी पोलीस उपनिरीक्षक वासुदेव मडावी यांच्या गौरवार्थ भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गेली २६ वर्षे नक्षलग्रस्त भागात बजावलेल्या शौर्य आणि कर्तव्यनिष्ठ सेवेबद्दल मंडळाने मडावी यांचा शाल-श्रीफळ देऊन सन्मान केला.
उप विभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे, त्यांच्या पत्नी सौ. कोकाटे, पोलीस निरीक्षक हर्षल ऐकरे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद दोन्तुल्वार, आणि व्यापारी कन्हैय्यालाल रोहरा यांच्यासारख्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
शौर्याचा गौरव
या कार्यक्रमात, घनदाट जंगल आणि नक्षल्यांच्या दहशतीमध्ये मागील २६ वर्षांपासून अखंड सेवा देणाऱ्या C-60 पोलीस उपनिरीक्षक वासुदेव मडावी यांच्या अतुलनीय योगदानाचा गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक नक्षलवाद्यांचा यशस्वीरित्या सामना केला असून, १०० हून अधिक चकमकींमध्ये सहभाग घेऊन आपले शौर्य सिद्ध केले आहे. त्यांच्या या धाडसी आणि कर्तव्यनिष्ठ कार्याबद्दल आझाद गणेश मंडळाने त्यांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास वीरगोनवार, सचिव संदीप गुमूलवार, उपाध्यक्ष तुषार पारेल्लीवार आणि इतर सर्व सदस्यांनी अथक परिश्रमातून केले. संतोष मद्दीवार यांनी प्रास्ताविक केले, तर अक्षय येन्नमवार यांनी सूत्रसंचालन केले. निखिल गद्देवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि अक्षय मंथनवार यांनी आभार प्रदर्शन केले.
आझाद गणेश मंडळाने या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवर, नागरिक आणि गणेशभक्तांचे मनःपूर्वक आभार मानले.




