अहेरी:
मेहनत, जिद्द आणि अचूक नेमबाजीच्या जोरावर आल्लापल्ली (ता. अहेरी) येथील सुपुत्री कु. अनन्या अविनाश सामलवार हिने क्रीडा क्षेत्रात आपल्या नावाचा आणि अल्लापल्ली परिसराचा मोठा नावलौकिक केला आहे. गुजरात येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शूटिंग स्पर्धेत तिने उल्लेखनीय कामगिरी करत थेट दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे.
गुजरात येथील राज्यस्तरीय शूटिंग स्पर्धेत १० मीटर एअर पिस्टॉल प्रकारात अनन्याने सहभाग घेतला होता. या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत तिने अत्यंत एकाग्रतेने खेळत ४०० पैकी ३४७ गुण मिळवले. तिच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
सैनिकी शाळेची विद्यार्थिनी:
मूळची अल्लापल्ली येथील रहिवासी असलेली अनन्या सध्या नेवासा येथील सैनिकी शाळेत शिक्षण घेत आहे. सैनिकी शाळेतील शिस्त, कठोर सराव आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे लहान वयातच तिने शूटिंग क्षेत्रात सातत्यपूर्ण यश मिळवले आहे.
परिसरात आनंदाचे वातावरण:
अनन्याच्या या अभूतपूर्व यशामुळे सामलवार कुटुंबीय, तिचे प्रशिक्षक, शिक्षक वर्ग तसेच अल्लापल्ली आणि गडचिरोली जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींमध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण आहे. तिने आपल्या यशाने परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
दिल्ली येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रीय स्पर्धेतही अनन्या अशीच चमकदार कामगिरी करून सुवर्णपदकाला गवसणी घालेल, असा दृढ विश्वास सर्व स्तरातून व्यक्त केला जात आहे. तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




