गडचिरोली:
गडचिरोलीच्या दुर्गम बांदे गावातील एका अत्यंत सामान्य कुटुंबातील तरुण इग्नासियस प्रकाश बाडा याने थेट ऑस्ट्रेलियातील नामांकित कर्टिन विद्यापीठात झेप घेत इतिहास रचला आहे. ‘लॉयड्स इनफिनिट फाउंडेशन’च्या कर्टिन युनिव्हर्सिटी स्पॉन्सरशिप प्रोग्राम अंतर्गत ‘मास्टर इन इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्युअरशिप’ ही पदवी यशस्वीरीत्या पूर्ण करून ते मायभूमीत परतले असून, त्यांनी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL) मध्ये ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ म्हणून आपल्या व्यावसायिक प्रवासाची सुरुवात केली आहे.
सुरजागड लोहखनिज खाणीच्या परिसरातील बांदे गावात सात जणांच्या कुटुंबात वाढलेल्या इग्नासियस यांचे कुटुंब साधारण परिस्थितीत राहणारे आहे. त्यांची आई सरिता अंगणवाडी मदतनीस असून वडील प्रकाश शेतकरी आहेत. अशा परिस्थितीत परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेणे ही इग्नासियस यांच्यासाठी अशक्यप्राय गोष्ट होती. मात्र, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडची CSR शाखा असलेल्या ‘लॉयड्स इनफिनिट फाउंडेशन’च्या शिष्यवृत्तीमुळे हे स्वप्न साकार झाले. या कार्यक्रमांतर्गत त्यांच्या शिक्षण शुल्कासह निवास, प्रवास आणि दैनंदिन खर्चाची संपूर्ण जबाबदारी फाउंडेशनने उचलली होती.
आपल्या या यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना इग्नासियस म्हणाले, “बांदे गावातून पर्थ (ऑस्ट्रेलिया) पर्यंतचा प्रवास माझ्यासाठी स्वप्नवत आहे. या संधीमुळे माझा आत्मविश्वास आणि दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. हा प्रवास शक्य करून दिल्याबद्दल मी श्री. बी. प्रभाकरन यांचा आभारी आहे. शिकून पुन्हा आपल्या मायभूमीत परतणे आणि गडचिरोलीच्या विकासात योगदान देणे हा या प्रवासाचा सर्वात अर्थपूर्ण भाग आहे.”
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर बी. प्रभाकरन यांनी २०२३ मध्ये स्थानिक युवकांना जागतिक दर्जाचे शिक्षण देऊन त्यांना परिसराच्या विकासात सहभागी करून घेण्याचे वचन दिले होते. इग्नासियस यांच्या रूपाने या स्पॉन्सरशिप प्रोग्रामचा पहिला यशस्वी टप्पा पूर्ण झाला आहे.
या यशावर बोलताना श्री. बी. प्रभाकरन म्हणाले, “हा केवळ इग्नासियसचा विजय नसून संपूर्ण गडचिरोलीचा अभिमान आहे. स्थानिक तरुणांना जागतिक संधी उपलब्ध करून देऊन त्यांना पुन्हा आपल्या भागाच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी सक्षम करणे, हाच आमचा हेतू होता. इग्नासियसचा हा प्रवास इतर अनेक तरुणांना नवी स्वप्ने पाहण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रेरित करेल.”
दुर्गम भागातून आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण घेऊन पुन्हा आपल्या गावात परतत लॉयड्स मेटल्समध्ये महत्त्वाच्या पदावर रुजू झालेल्या इग्नासियस बाडा यांची ही यशोगाथा सध्या गडचिरोली जिल्ह्यातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा मोठा स्रोत ठरत आहे




