अहेरी:
अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयात सध्या भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे रिक्त पदांमुळे रुग्ण सेवा कोलमडली असताना, दुसरीकडे पाच डॉक्टरांनी एकाच वेळी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. या गंभीर परिस्थितीच्या निषेधार्थ आज, २९ जून रोजी स्थानिकांनी ‘ताला ठोको’ आंदोलन केले, ज्यानंतर पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ च्या शासन निर्णयानुसार पदभरती करण्यात यावी, या मागणीसाठी अहेरीतील नागरिक आक्रमक झाले होते. २८ जूनपर्यंत ही पदभरती न झाल्यास आंदोलन करण्याचा नगरसेवक अमोल मुक्कावार यांच्या मार्फत इशारा देण्यात आला होता. त्यानुसार आज (२९ जून) आंदोलन करण्यात आले.
परिस्थितीचे गांभीर्य पाहून वैद्यकीय अधीक्षक के. डी. मडावी यांनी आरोग्य उपसंचालकांशी, नगरसेवक अमोल मुक्कावार यांच्या माध्यमातून भ्रमणध्वनीवर चर्चा केली. तात्काळ चार डॉक्टर ‘डेप्युटेशन’वर पाठवण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. मात्र, आंदोलक केवळ तात्पुरत्या उपायांवर समाधानी नसून, शासनाच्या नियमानुसार कायमस्वरूपी पदभरती करण्याच्या मागणीवर ठाम आहेत.
आंदोलन सुरू असतानाच रुग्णालयातील पाच डॉक्टरांनी राजीनामा दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हे राजीनामे केवळ वैयक्तिक कारणांमुळे आहेत की, वरिष्ठ स्तरावरून मिळणाऱ्या वागणुकीमुळे हा एक ‘सामूहिक निषेध’ आहे? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टरांना अनेक मूलभूत समस्यांचा सामना करावा लागत आहे.
डॉक्टरांच्या राहण्याची आणि जेवणाची योग्य सोय नाही.दुर्गम भागात मोबाईल नेटवर्कची मोठी समस्या आहे पण अहेरी येथील दवाखाना परिसरात सुद्धा मोठी समस्या असल्याने डॉक्टरांना संपर्क करण्यास मोठी अडचण होत आहे.
समस्या सोडवण्याऐवजी डॉक्टरांवरच कारवाईची धमकी दिली जात असल्याचा दबक्या आवाजाने चर्चा होत आहे.
अशा परिस्थितीत डॉक्टर कसे राहतील हेही विचार करण्यासारखे आहे.
या आंदोलनात राहुल दुर्गे, अमोल रामटेके, सुमित मोतकूरवार, स्वप्नील श्रीरामवार, इम्मा शेख, प्रभाकर कुसराम, रवी पेद्दल, शाहरुख शेख, अभिषेक दोंतुलवार, शंकर कटलावर, गोपाल पुसलवार, दीपक तुमावार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. “आरोग्य यंत्रणा उद्ध्वस्त करणाऱ्या प्रशासकीय धोरणांचा आम्ही निषेध करतो,” अशा शब्दांत आंदोलकांनी संताप व्यक्त केला.




