गडचिरोली:
महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शासन स्तरावरील विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेकरिता दिनांक १४ मे २०२६ पासून राज्यभर टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून दिनांक १४ ते १६ मे २०२६ या कालावधीत काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले. राज्यभरातील विद्यापीठ व महाविद्यालयांप्रमाणेच गोंडवाना विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवून पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला.
आंदोलनाचा दुसरा टप्पा आज दिनांक १८ मे २०२६ पासून सुरू झाला असून दिनांक १८ ते २० मे २०२६ दरम्यान धरणे आंदोलन, निषेध सभा व घोषणाबाजी करण्यात येणार आहे. त्यानुसार आज गोंडवाना विद्यापीठातील सर्व कर्मचारी परीक्षा भवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एकत्रित आले. यावेळी कर्मचाऱ्यांनी शासनाच्या उदासीन धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला.
संयुक्त कृती समितीच्या प्रमुख मागण्यांमध्ये सातव्या वेतन आयोगानुसार आश्वासित प्रगती योजना लागू करणे, उर्वरित कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करणे, रिक्त शिक्षकेतर पदभरतीस मंजुरी देणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित लाभ मंजूर करणे तसेच DCPS व इतर सेवाविषयक प्रश्न निकाली काढणे आदी मागण्यांचा समावेश आहे.
यावेळी गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे सचिव सतीश पडोळे यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनाचा आज पाचवा दिवस असून राज्यभरातील कर्मचारी आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या भावना व रोष व्यक्त करीत आहेत. तथापि, इतक्या व्यापक आंदोलनानंतरही शासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले की, कर्मचाऱ्यांच्या संयमाचा शासनाने अंत पाहू नये. मागण्यांबाबत तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास कर्मचाऱ्यांवर लेखणी बंद आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याची वेळ येणार असून त्याची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील. सद्यस्थिती पाहता शासन अद्यापही “झोपेचे सोंग” घेत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संघटित राहून एकजुटीने लढा देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच, पुढील टप्प्यात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा देत सर्व कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सक्रिय सहभाग कायम ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात सुरू असलेल्या या आंदोलनात विद्यापीठातील मोठ्या संख्येने शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.




