कोणत्याही नोटीसशिवाय आणि राजकीय षडयंत्रातून इमारत पाडली गेली:पत्रकार परिषदेत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आरोप.

0
11

अहेरी:8फेब्रुवारी

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी नगरपंचायत क्षेत्रात सध्या प्रशासकीय ‘दबंगगिरी’ आणि राजकीय सूडबुद्धीची कामे जोरात सुरू आहे असे म्हणत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी माझी गडअहेरी मार्गावरील चार मजली इमारत नगरपंचायतीने कोणत्याही पूर्वसूचना किंवा कायदेशीर नोटीसशिवाय पोलीस बळाचा वापर करून पाडल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला आहे.सध्या ६ फेब्रुवारी २०२६ ला नागपूर खंडपीठाने चार आठवड्याची स्थगित दिल्याची माहिती अजय कंकडालवार यांनी अहेरी येथील पत्रकार परिषदेत दिली आहे.

अजय कंकडालवार यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या इमारतीवर नगरपंचायतीने बुलडोजर चालवला, त्या जागेची सर्व कायदेशीर कागदपत्रे त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. यामध्ये प्रॉपर्टी कार्ड, मोजणीचा नकाशा आणि क-शीट यांसारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या जागेबाबतचे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असताना आणि नगररचना विभागाकडे अपील केलेली असतानाही प्रशासनाने ही घाईघाईने माझ्या इमारतीवर कारवाई केली.प्रशासकीय अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करीत अजय कंकडालवार यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गणेश शहाणे आणि त्यांचे सहकारी वैभव पांढरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. “या अधिकाऱ्यांनी राजकीय दबावाखाली येऊन किंवा मला राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी हे षडयंत्र रचले आहे. माझी सर्व कागदपत्रे वैध असतानाही मला कोणतीही नोटीस न देता पोलीस बंदोबस्तात माझे घर पाडण्यात आले. ही सरळ सरळ प्रशासकीय दबंगगिरी आहे,” असे अजय कंकडालवार यांनी नमूद केले.आंदोलनाचा इशारा देत या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी अजय कंकडालवार यांनी जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ शासनाकडे धाव घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. “जर मला न्याय मिळाला नाही, तर येत्या काळात न्यायालय, उपोषण आणि जनआंदोलनाचा मार्ग पत्करू,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.या प्रकरणावर आता नगरपंचायत प्रशासन किंवा वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

कोट:

नगर भूमापन क्रमांक ५१/२ चा अकृषक आदेश मधील अट क्रमांक एक नुसार सदर जागेवर बांधकाम करण्यापूर्वी स्थानिक नियोजन प्राधिकरणाच्या मापदंडानुसार बांधकाम करण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांनी निर्देश दिलेले आहेत. जर तसे बांधकाम न झाल्यास सदर बांधकाम पाडण्यात येईल असे सुद्धा निर्देश देण्यात आलेले आहेत. अट क्रमांक पाच नुसार सदर नगर भूमापन क्रमांकमध्ये कोणत्याही व्यक्तीचे अनधिकृत ताबा आढळून आल्यास जमीन पूर्ववत करण्याची कार्यवाही करण्यात येईल अशी अट आहे.

​सर्व कारवाई अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालयाने अहेरी अजय कंकडालवर यांचा बांधकाम पडण्याला स्टेटस quo अर्ज व अपील फेटाळल्यामुळे व कोणताही स्टे नसल्यामुळे कारवाई करण्यात आलेली आहे.

– गणेश शहाणे, मुख्याधिकारी, नपं अहेरी