अहेरी:
पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून लाखो-कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अहेरी–चेरपल्ली–पुसुकपल्ली मार्गावरील नवनिर्मित पुलाची दीड-दोन वर्षांतच दुरवस्था झाली आहे. पुलाच्या अगदी प्रवेशद्वारावरच एक अतिशय खोल आणि धोकादायक खड्डा पडला असून, प्रशासनाने त्यावर केवळ दगड-माती टाकून ‘तात्पुरती मलमपट्टी’ केल्याचे उघडकीस आले आहे. या निष्काळजीपणामुळे रोज प्रवास करणाऱ्या शेकडो वाहनचालकांचा आणि स्थानिक नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे.
या मार्गावर सतत दुचाकी, चारचाकी आणि मालवाहू वाहनांची प्रचंड रहदारी असते. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचत असल्याने खड्ड्याची खोली वाहनचालकांच्या लक्षात येत नाही. विशेषतः रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांना हा खड्डा न दिसल्यास भीषण अपघात होऊन जीवितहानी होण्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहे. ‘प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का?’ असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह आणि भ्रष्टाचाराचा संशय
उद्घाटनाचा गाजावाजा करून वर्ष-दोन वर्षेही पूर्ण होत नाहीत, तोच पुलाची ही दुरवस्था झाल्याने कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. यात वापरण्यात आलेले निकृष्ट दर्जाचे साहित्य आणि पाण्याचा योग्य निचरा न होणारी रचना यांमुळेच ही स्थिती ओढवल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
रस्ता व पुलाच्या बांधकामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत तातडीने स्वतंत्र तांत्रिक तपासणी करण्यात यावी. दोषींवर कठोर कारवाई करावी कामात त्रुटी आढळल्यास संबंधित कंत्राटदार, जबाबदार अभियंते आणि अधिकाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी.खड्ड्यात माती-दगड न टाकता पाण्याचा निचरा होईल अशी मजबूत, तांत्रिक आणि कायमस्वरूपी दुरुस्ती तातडीने करावी.
अपघात झाल्यानंतर चौकशीचे नाटक करण्यापेक्षा प्रशासनाने वेळेच जागे होऊन या जीवघेण्या खड्ड्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.




