अहेरी :
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत अहेरी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ईतलचेरूने ‘व्हिसल फॉर सिक्युरिटी’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना संकटाच्या प्रसंगी शिट्टी वाजवून आसपासच्या नागरिकांचे लक्ष वेधण्याचे आणि तत्काळ मदत मिळविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
ग्रामीण आणि दुर्गम भागातील अनेक विद्यार्थी घरापासून शाळेपर्यंत पायी प्रवास करतात. या प्रवासादरम्यान निर्जन रस्ते, जंगल परिसर, अनोळखी व्यक्ती किंवा इतर आकस्मिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. अशा वेळी विद्यार्थ्यांच्या हातात सहज वापरता येणारे सुरक्षासाधन असावे, या उद्देशाने शाळेने हा उपक्रम राबविला आहे.
विद्यार्थ्यांना शिट्टीचा योग्य वापर कसा करावा, कोणत्या परिस्थितीत ती वाजवावी, धोका जाणवल्यास सुरक्षित ठिकाणी कसे जावे आणि शिक्षक, पालक किंवा जवळच्या व्यक्तीशी त्वरित संपर्क कसा साधावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिट्टीचा आवाज दूरपर्यंत पोहोचत असल्याने संकटग्रस्त विद्यार्थ्याकडे नागरिकांचे लक्ष वेधले जाऊन वेळेवर मदत मिळू शकते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, प्रसंगावधान आणि आत्मसंरक्षणाची जाणीव निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत कमी खर्चात आणि सहजपणे राबविता येणारा हा उपक्रम इतर शाळांसाठीही दिशादर्शक ठरू शकतो.
ईतलचेरू शाळा विविध शैक्षणिक आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे यापूर्वीही चर्चेत राहिली आहे. ‘व्हिसल फॉर सिक्युरिटी’च्या माध्यमातून शाळेने गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही प्रभावीपणे अधोरेखित केली आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याच्या सुरक्षेसाठी छोटी शिट्टी—मोठा आधार!
संकटाच्या वेळी घाबरून न जाता शिट्टी वाजवून मदत मागणे, सुरक्षित ठिकाणी जाणे आणि विश्वासू व्यक्तीशी संपर्क साधणे, हा संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे.




