आलापल्ली (विशेष प्रतिनिधी):
येथील राजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांची रिक्त पदे, न होणाऱ्या तासिका आणि वेळ बदलामुळे निर्माण झालेल्या समस्यांविरोधात स्थानिक ‘जेन झी’ (जागरूक युवकांनी) आक्रमक पवित्रा घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी होणारा खेळ त्वरित थांबवून या सर्व समस्यांवर ८ दिवसांत तोडगा न काढल्यास महाविद्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा गुरुवारी देण्यात आला.
नवीन शैक्षणिक सत्र सुरू होऊन दोन महिने उलटले तरी ११ वी आणि १२ वीच्या फिजिक्स व मॅथेमॅटिक्ससारख्या महत्त्वाच्या विषयांच्या तासिका सुरूच झालेल्या नाहीत. या कनिष्ठ महाविद्यालयात तब्बल ५ पदे रिक्त असून मराठी व इंग्रजीचे वर्ग माध्यमिकच्या शिक्षकांवर ढकलले जात आहेत. सुमारे १४० विद्यार्थ्यांचे यामुळे मोठे शैक्षणिक नुकसान होत असून, पुरेशी पूर्वसूचना न देता कॉलेजची वेळ सकाळी ७ ऐवजी १० वाजता केल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांची बसअभावी तीव्र गैरसोय होत आहे.
या सर्व गंभीर प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तरुणांनी प्राचार्यांना थेट निवेदन सादर केले. ‘विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि हक्क यासाठी युवक एकत्र’ असा एल्गार पुकारत स्थानिक तरुण रस्त्यावर उतरल्याने परिसरात या आंदोलनाची जोरदार चर्चा रंगली आहे. आता व्यवस्थापन किती दिवसांत या समस्येवर तोडगा काढतात ह्या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




