अहेरी: स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्यासाठी आणि आंदोलनाची तीव्रता केंद्र व राज्य सरकारला पटवून देण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने ‘मिशन २०२७’ अंतर्गत अहेरी येथे भव्य ‘विदर्भ राज्य निर्माण जनसंकल्प मेळावा’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा मंगळवार, ८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता महागाव रोड येथील इंडियन पॅलेस फंक्शन हॉलमध्ये पार पडणार आहे.
‘अभी नहीं तो कभी नहीं’चा नारा विदर्भ राज्य आंदोलन समितीने डिसेंबर २०२७ पूर्वी स्वतंत्र विदर्भाची मागणी पूर्ण पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे. “अभी नहीं तो कभी नहीं” हे ब्रीदवाक्य घेऊन विदर्भातील ११ जिल्ह्यांतील १२० तालुक्यांत जनसुनावणी आणि जनजागरणाचे कार्यक्रम राबवले जात आहेत.
आर्थिक अनुशेष आणि विदर्भावर अन्याय समितीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, महाराष्ट्राची वाटचाल आर्थिक दिवाळखोरीकडे सुरू आहे. राज्यावर सुमारे ११ लाख २ हजार ६५४ कोटी रुपयांचे कर्ज असून, केवळ व्याजाचा बोजा ६४ हजार ६५९ कोटी रुपये आहे. तसेच विदर्भाचा सिंचन अनुशेष ६० हजार कोटी रुपये आणि इतर विकास कामांचा अनुशेष १५ हजार कोटींचा (एकूण ७५ हजार कोटी रुपये) आहे. हा अनुशेष भरून निघणे अशक्य असल्याने विदर्भवासीयांच्या सक्षम भविष्यासाठी ‘स्वतंत्र विदर्भ राज्य’ हाच एकमेव पर्याय असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
अध्यक्ष: ॲड. वामनराव चटप (अध्यक्ष, विराआंस तथा माजी आमदार,उद्घाटक म्हणून प्रकाशभाऊ पोहरे (प्रबंध संपादक, दैनिक देशोन्नती) या मेळाव्याचे स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. प्रा. नीरज खोब्रागडे तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, सरदार जगजीत सिंग, मंजुषाताई तिरपुडे, मुकेश मासुरकर, अरुणभाऊ केदार, डॉ. प्रा. पी. आर. राजपूत, सुनीलभाऊ चोखारे, ॲड. सुरेश वानखेडे, डॉ. रमेशकुमार गजबे यांसह इतर प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
या जनसंकल्प मेळाव्यास अहेरी परिसरातील नागरिक, युवक व विदर्भवादी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.




